कोळसा उत्पादनाच्या बाबतीत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. तर चीननं ४७८०.० दशलक्ष टन कोळशासह अव्वल स्थान पटकावले आहे. तर, भारताचं उत्पादन १०८५.१ दशलक्ष टन आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या बाबतीत भारतानं अमेरिका, इंडोनेशिया आणि तुर्कस्तान सारख्या देशांना मागे टाकलंय.
एनर्जी इन्स्टिट्यूटच्या स्टॅटिस्टिकल रिव्ह्यू ऑफ वर्ल्ड एनर्जी २०२४ च्या ताज्या अहवालात भारताला कोळसा उत्पादनाच्या बाबतीत जागतिक पॉवरहाऊस म्हणून सांगण्यात आलं आहे. चीनचं कोळशाचं उत्पादन भारतापेक्षा चौपट आहे, जे तेथील औद्योगिक आणि ऊर्जेच्या मागणीचं प्रतिबिंब आहे. पण भारताचं १०८५.१ दशलक्ष टन उत्पादन काही कमी नाही. ही आकडेवारी भारताची वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आणि ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णतेच्या दिशेनं टाकलेलं पाऊल दर्शवते.
त्याचबरोबर कोळसा हा भारतातील वीजनिर्मितीचा सर्वात मोठा स्त्रोत असून या क्षेत्रातील भारताच्या वाढीमुळे जागतिक बाजारपेठेत आपली पकड अधिक मजबूत होत आहे. इंडोनेशिया ८३६.१ दशलक्ष टनांसह आणि अमेरिका ४६४.६ दशलक्ष टनांसह चौथ्या क्रमांकावर आहे. हे देश भारतापेक्षा खूप मागे आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि रशियाही मागे
तर ऑस्ट्रेलिया (४६२.९ दशलक्ष टन) आणि रशिया (४२७.२ दशलक्ष टन) हे देशही या शर्यतीत भारतापेक्षा मागे पडले आहेत. तुर्कस्तानचं उत्पादन ८७.० दशलक्ष टन होते, जे भारतापेक्षा खूपच कमी आहे. भारताचं कोळसा उत्पादन वाढवणं हे ऊर्जा सुरक्षा आणि औद्योगिक वाढीसाठी चांगलं लक्षण असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. मात्र, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून कोळशावरील अवलंबित्व कमी करण्याच्या गरजेवरही भर दिला जात आहे. भारत सरकार नवीकरणीय ऊर्जेवर लक्ष केंद्रित करत आहे, परंतु कोळसा अजूनही देशाच्या उर्जेच्या गरजेचा एक मोठा भाग पूर्ण करतो.
या यादीत दक्षिण आफ्रिका, कझाकस्तान, मंगोलिया आणि जर्मनी सारख्या देशांचाही समावेश आहे, परंतु भारताची कामगिरी त्या सर्वांपेक्षा चांगली होती. हे यश भारताच्या खाण आणि उत्पादन क्षमतेचा पुरावा आहे. येत्या काळात भारतातील कोळसा क्षेत्र अधिक बळकट होईल, पण शाश्वत विकासासाठी हरित ऊर्जेकडे वळणंही गरजेचं आहे.