नवी दिल्ली - देशातील घाऊक महागाईचा दर (डब्ल्यूपीआय) ऑक्टोबरमध्ये कमी होऊन उणे (-) १.२१ टक्क्यावर आला. डाळी, भाज्या या खाद्य वस्तूंच्या किमती घसरल्याने तसेच इंधन आणि वस्तू उत्पादन क्षेत्राचे दर कमी झाल्याने ही घट झाली आहे.
शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या सरकारी आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई ०.१३ टक्के होती, तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ती २.७५ टक्के होती. ऑक्टोबरमध्ये खाद्य क्षेत्रात ८.३१ टक्के घसरण दिसली. कांदा, बटाटा, भाज्या आणि डाळी यांच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली. भाज्यांमधील घसरण ३४.९७% तसेच डाळीत १६.५०%, बटाट्यात ३९.८८%, तर कांद्यात ६५.४३% घसरण नोंदली गेली.
उत्पादित वस्तूंमध्ये महागाई १.५४ टक्क्यावर आली, तर इंधन-वीज क्षेत्रात (-) २.५५% घसरण झाली. २२ सप्टेंबरपासून जीएसटी दर कमी झाल्याने डब्ल्यूपीआय खाली
येणे अपेक्षित होते.
दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी करतानाच स्लॅब ५% व १८% असे दोनच ठेवण्यात आले आहेत. करकपातीमुळे घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही क्षेत्रांतील महागाई कमी झाली आहे.
आरबीआयने मागील महिन्यात व्याजदर ५.५ टक्के ठेवले होते, परंतु महागाई आणखी घसरल्याने पतधोरण समितीच्या डिसेंबरच्या बैठकीत दरकपात होण्याची शक्यता वाढली आहे. त्याचा सर्वसामान्यांना फायदा होईल.
