लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: जगातील नामांकित उद्योगसमूह ‘हिंदुजा ग्रुप’चे चेअरमन आणि ब्रिटनमधील सर्वाधिक श्रीमंत भारतीय उद्योगपतींपैकी एक गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडन येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. काही आठवड्यांपासून आजारी असलेले हिंदुजा यांचे निधन लंडनमधील रुग्णालयात झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता, पुत्र संजय व धीरज तसेच कन्या रीता असा परिवार आहे.
१९४० साली जन्मलेले गोपीचंद हे हिंदुजा बंधूंपैकी दुसरे होते. त्यांनी वडील परमानंद हिंदुजा यांच्या व्यापार व्यवसायाचा वारसा पुढे नेऊन समूहाला जागतिक स्तरावर पोहोचवले. त्यांच्या नेतृत्वात हिंदुजा समूहाने १९८४ मध्ये गल्फ ऑइल आणि १९८७ मध्ये संघर्ष करणारी ‘अशोक लेलँड’ कंपनी विकत घेतली. ही भारतातील पहिली मोठी परदेशी गुंतवणूक ठरली. हिंदुजा समूहाची सुरुवात कपडे, सुकामेवा व चहाच्या व्यापारातून झाली होती. आज हिंदुजा समूहाचा व्यवसाय ३८ देशांमध्ये विस्तारलेला आहे.
‘लोकमत’ने केले होते सन्मानित
लंडनमध्ये अलीकडे झालेल्या ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’ दरम्यान लोकमत मीडिया ग्रुपतर्फे गोपीचंद हिंदुजा यांना ‘जीवनगौरव – लोकमत भारत भूषण पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले होते. ते स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते, पण त्यांचा मुलगा संजय हिंदुजा, मुलगी रितू छाब्रिया आणि जावई प्रकाश छाब्रिया यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता.
३.७ लाख कोटी रुपये संपत्ती असलेल्या समूहाचे केले नेतृत्व
गोपीचंद हिंदुजा यांनी समूहाला ऊर्जा, बँकिंग, पायाभूत सुविधा आणि ऑटोमोबाईल या क्षेत्रांत नेले. त्यांच्या नेतृत्वाखाली समूहाने भारतात मल्टी-गिगावॅट ऊर्जा प्रकल्प उभारणीचे नियोजन केले. २०२३ मध्ये मोठे बंधू श्रीचंद हिंदुजा यांच्या निधनानंतर त्यांनी सुमारे ३.७ लाख कोटी रुपये संपत्ती असलेल्या समूहाचे नेतृत्व स्वीकारले.
भारतावर होते विशेष प्रेम
हिंदुजा हे भारत आणि ब्रिटन यांच्यातील आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिले. त्यांनी व्यावसायिक मंचावर अनेकदा भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक वाढवण्याचे आवाहन केले होते. जी.पी. हिंदुजा यांच्या निधनाने ब्रिटनमधील भारतीय उद्योगजगत, व्यावसायिक समुदाय आणि नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
