कंपन्यांचे सीईओ आणि सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या वेतनातील मोठी तफावत आता चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. जागतिक सीईओंच्या सरासरी वेतनात २०१९ पासून खऱ्या अर्थानं ५० टक्के वाढ झाली आहे, तर सरासरी कर्मचाऱ्यांच्या वेतनात केवळ ०.९ टक्के वाढ झाली आहे. ऑक्सफॅमच्या स्टडी रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. भारतात कंपन्यांच्या सीईओंचं वार्षिक वेतनही सरासरी २० लाख डॉलरवर पोहोचलं आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सामान्य कर्मचारी यांच्यातील वेतनातील तफावत धक्कादायक पातळीवर गेल्याचं या अभ्यासातून दिसून आले आहे. वास्तविकता अशी आहे की अब्जाधीश वर्षभरात सरासरी कर्मचाऱ्यापेक्षा एका तासात जास्त कमाई करत आहेत.
२० लाख डॉलर्सपर्यंत सरासरी वेतन
रिपोर्टनुसार, "सीईओंचे पगार २०१९ मध्ये २९ लाख डॉलर्सवरून प्रत्यक्षात ५० टक्क्यांनी वाढले आहेत. ही वाढ त्याच कालावधीत सरासरी कर्मचाऱ्याच्या पगारात झालेल्या ०.९ टक्के वास्तविक वाढीपेक्षा खूपच जास्त आहे." या अभ्यासात वेगवेगळ्या देशांमधील सीईओंच्या पगाराचं विश्लेषण केलं गेलं, ज्यामध्ये आयर्लंड आणि जर्मनी अनुक्रमे सरासरी ६७ लाख डॉलर्स आणि ४७ लाख डॉलर्ससह यादीत अव्वल स्थानावर आहेत. भारतातही २०२४ मध्ये कंपन्यांच्या सीईओंचा सरासरी पगार २०लाख डॉलर्सपर्यंत पोहोचण्याला होता.
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
सर्वसामान्य कामगारांची जगण्यासाठी धडपड
ऑक्सफॅम इंटरनॅशनलचे कार्यकारी संचालक अमिताभ बेहर यांनी वेतनातील विषमतेवर तीव्र चिंता व्यक्त केली. "ही प्रणालीगत गडबड नाही. जेव्हा लाखो कामगार जगण्यासाठी संघर्ष करत असतानाच संपत्तीच्या सतत वरच्या प्रवाहासाठी डिझाइन केलेली प्रणाली आहे," असं ते म्हणाले. राहणीमानाचा खर्च झपाट्यानं वाढत असताना आणि कामगारांचं वेतन महागाईशी जुळवून घेण्यात अपयशी ठरत असताना वेतनातील तफावत समोर आली आहे.
स्त्री-पुरुष वेतनातील तफावतीत किरकोळ घट
इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या (आयएलओ) म्हणण्यानुसार, २०२४ मध्ये वास्तविक वेतनात २.७ टक्क्यांनी किंचित वाढ झाली आहे, परंतु अनेक देशांमधील कामगारांचं वेतन स्थिर आहे. जागतिक स्तरावर स्त्री-पुरुष वेतनातील तफावत किंचित कमी झाली असली, तरी ती चिंताजनकरित्या अधिक आहे. विश्लेषणानुसार, २०२२ आणि २०२३ दरम्यान सरासरी स्त्री पुरुष वेतनातील तफावत २७ टक्क्यांवरून २२ टक्क्यांवर आली आहे.