DA Hike News: होळीपूर्वी केंद्र सरकारच्या १ कोटींपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना गुड न्यूज मिळू शकते. उद्या केंद्र सरकारच मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करू शकते. उद्या म्हणजेच ५ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे, ज्यात महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी मिळू शकते. याआधीही होळीपूर्वीच सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट दिली होती.
महागाई भत्त्याची गणना AICPIN (All India Consumer Price Index for Industrial Workers) च्या आकड्यांच्या आधारे केली जाते. सातव्या वेतन आयोगानुसार ठरवून दिलेल्या मानकाप्रमाणे वर्षातून दोनवेळा महागाई भत्त्यात वाढ केली जाते. पहिली दुरुस्ती १ जानेवारीपासून लागू होते, तर दुसरी दुरुस्ती त्याच वर्षी १ जुलैपासून लागू होते. त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
डीए किती वाढू शकतो?
- जून २०२४ मध्ये सरकारने महागाई भत्ता ५० टक्क्यांवरून ५३ टक्के केला होता.
- आता एआयसीपीआयएनच्या नव्या आकडेवारीनुसार जानेवारी २०२५ मध्ये महागाई भत्त्यात आणखी ३ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
- म्हणजेच १ जानेवारी २०२५ पासून महागाई भत्ता ५६ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.
नवीन महागाई भत्ता केव्हापासून लागू होणार?
याची अंमलबजावणी १ जानेवारी २०२५ पासून होणार आहे. मात्र, त्याची घोषणा मार्चमध्ये होणार आहे. साधारणपणे होळीच्या सुमारास सरकार याची घोषणा करते. सध्या १ जुलै २०२४ पासून ५३ टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. कॅबिनेटच्या मंजुरीनंतर अर्थ मंत्रालय त्याची अधिसूचना जारी करते.