मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) ३,७५० कोटी रुपयांचे नुकसान केल्याच्या आरोपावरून सीबीआयनेअनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सविरोधात बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एलआयसीने दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे सीबीआयने हा गुन्हा दाखल केला आहे. अनिल अंबानी यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केलेला हा तिसरा गुन्हा आहे.
प्राप्त माहितीनुसार, कंपनीच्या व्यवस्थापनाने कंपनीची आर्थिक स्थिती, तसेच एलआयसीला दिलेल्या सुरक्षेची आणि मालमत्तेची चुकीची माहिती घेऊन एलआयसीला ४,५०० कोटी रुपयांच्या नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्समध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तसेच, हा निधी प्राप्त झाल्यानंतर कंपनीने हा निधी ज्या कारणांसाठी घेतला होता. त्यासाठी वापर न करता हा निधी उपकंपन्यांमार्फत निधी वळवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याची शंका आल्यानंतर एलआयसीने या प्रकरणाचे फोरेन्सिक लेखा परीक्षण केले व त्यानंतर हा घोटाळा झाल्याचे एलआयसीच्या निदर्शनास आले. त्यानंतर आता एलआयसीने सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे.
