Donald Trump Tariff War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅल्युमिनियम आणि स्टीलच्या आयातीवरील शुल्क वाढवण्याच्या निर्णयाला प्रमुख व्यापारी भागीदारांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. कापड आणि वॉटर हीटरपासून ते बीफ आणि बॉर्बनपर्यंत अनेक अमेरिकन उत्पादनांवर त्यांनी नवीन आणि कठोर शुल्क लादलंय. अमेरिकेला स्टील आणि अॅल्युमिनियमचा सर्वात मोठा पुरवठादार असलेल्या कॅनडानं स्टील उत्पादनांवर २५ टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे. याशिवाय उपकरणे, कम्प्युटर आणि सर्व्हर, डिस्प्ले मॉनिटर, क्रीडा उपकरणे आणि कास्ट आयर्न उत्पादनं अशा अनेक वस्तूंवर करवाढ केली जाणार आहे.
EU देखील वाढवणार टॅरिफ
त्याचवेळी युरोपियन युनियन (EU) अमेरिकन गोमांस, पोल्ट्री, बॉर्बन आणि मोटारसायकल, पीनट बटर आणि कमोडिटीवर शुल्क वाढवणार आहे. एकूणच, नवीन शुल्कामुळे कंपन्यांना अब्जावधी डॉलर्सचा फटका बसणार आहे आणि जगातील दोन प्रमुख व्यापार भागीदारीच्या अनिश्चिततेत भर पडण्याची शक्यता आहे. कंपन्यांना एकतर तोटा सहन करावा लागेल आणि कमी नफा होईल किंवा जास्त किंमतीच्या स्वरूपात ते खर्च ग्राहकांवर टाकतील अशी शक्यता जास्त आहे.
युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी, किंमती वाढतील आणि युरोप, अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात येतील असं म्हटलंय, आम्हाला या निर्णयाचा तीव्र खेद आहे. टॅरिफ म्हणजे कर. ते व्यवसायासाठी वाईट आहेत आणि ग्राहकांसाठी त्याहूनही वाईट असल्याचं त्यांनी म्हटलं.
कॅनडाचे पंतप्रधान ट्रम्प यांना भेटणार?
कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान मार्क कार्नींनी, ट्रम्प यांनी कॅनडाच्या सार्वभौमत्वाचा आदर दाखवला आणि व्यापारासाठी सामायिक आणि अधिक व्यापक दृष्टिकोन स्वीकारण्यास तयार असतील तर ते भेटण्यास तयार असल्याचं म्हटलं. जगातील सर्वात मोठ्या आर्थिक आणि सुरक्षा भागीदारीचे नूतनीकरण आणि पुन्हा सुरुवात झाल्यास दोन्ही देशांमधील कामगारांची स्थिती सुधारेल आणि हे शक्य आहे, असं ते म्हणाले.