Minimum Balance In Saving Account: नुकताच आयसीआयसीआय बँकेनं ग्राहकांना झटका देत बचत खात्यातील मिनिमम बॅलन्सची रक्कम ५० हजारांपर्यंत वाढवली आहे. यानंतर आता यासंदर्भात काही नियम आहे का असा प्रश्न अनेकांना पडलाय. यावर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक रक्कम निश्चित करण्याचं स्वातंत्र्य बँकांना आहे आणि ते आरबीआयच्या नियामक अधिकारक्षेत्रात नाही, असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सोमवारी सांगितलं.
गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील गोजारिया ग्रामपंचायतीत आर्थिक समावेशन कार्यक्रमाच्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. एका खाजगी बँकेद्वारे बचत खात्यांसाठी किमान शिल्लक रक्कम वाढवण्याबाबत संजय मल्होत्रा यांना प्रश्न विचारण्यात आला होता. "किमान शिल्लक रक्कम निश्चित करण्याचं काम आरबीआयनं प्रत्येक बँकेवर सोपवले आहे. काही बँकांनी ते १०,००० रुपये, काहींनी २००० रुपये आणि काहींनी (ग्राहकांना) सूट दिली आहे. ते (आरबीआयच्या) नियामक अधिकारक्षेत्रात नाही," असं संजय मल्होत्रा म्हणाले.
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
आयसीआयसीआय बँकेनं केलीये वाढ
आयसीआयसीआय बँकेनं १ ऑगस्टपासून नवीन बचत खातं उघडणाऱ्यांसाठी किमान शिल्लक मर्यादा वाढवली आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, बचत बँक खात्यातील किमान सरासरी मासिक शिल्लक (एमएबी) १०,००० रुपयांवरून पाच पटींनी वाढवून ५०,००० रुपये करण्यात आली आहे. निम-शहरी आणि ग्रामीण भागांसाठी ही रक्कम अनुक्रमे २५,००० आणि १०,००० रुपये करण्यात आली आहे.
दुसरीकडे, स्टेट बँकेनं किमान शिल्लक न ठेवण्याबद्दल बचत खातेधारकांना दंड न करण्याचा निर्णय घेतला आहे. मल्होत्रा यांनी या कार्यक्रमात सांगितले की, नवीन युगात यश मिळवण्यासाठी डिजिटल साक्षरता खूप महत्त्वाची आहे. पूर्वी असं म्हटलं जात होतं की जर तुम्ही अभ्यास केला नाही तर तुम्ही प्रगती करू शकणार नाही. आजच्या युगात डिजिटल साक्षरतेलाही हेच लागू होते. जर तुमच्याकडे डिजिटल साक्षरता नसेल तर तुम्ही प्रगती करू शकणार नाही.