Mobile Call Forwarding Scam : एखाद्या अनोळखी व्यक्तीने प्लिज तुमच्या मोबाईलवरुन एक कॉल करू? अशी विचारणा केली तर वेळीच सावध व्हा! कारण, सायबर गुन्हेगार लोकांना गंडवण्यासाठी आता नवीन स्कॅम करत आहेत. एका इन्स्टाग्राम हँडलने शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे या धक्कादायक स्कॅमचा पर्दाफाश झाला असून, देशातील हजारो नागरिक याला बळी पडले आहेत.
तुम्हाला कसं जाळ्यात ओढळं जातं?
स्कॅमर स्वतःला डिलिव्हरी एजंट, कुरिअर बॉय किंवा अडचणीत सापडलेला सामान्य नागरिक भासवतात. माझा फोन बंद झाला आहे, किंवा चोरीला गेला असून मला घरी एक फोन करायचा आहे? अशी याचना तुमच्याकडे करतात. गरजवंत पाहून लोकही याला बळी पडून मोबाईल गुन्हेगारांच्या हातात देतात. तुम्ही फोन हातात देताच, ते त्यामध्ये एक विशेष कोड डायल करतात. हा कोड डायल करताच तुमच्या सिमकार्डवरील सर्व कॉल्स स्कॅमरच्या नंबरवर 'फॉरवर्ड' होतात. यामुळे तुमच्या बँकेचे किंवा सोशल मीडियाचे सर्व 'व्हॉईस ओटीपी' थेट स्कॅमरला मिळतात आणि ते तुमचं खातं रिकामं करू शकतात.
कसा ओळखायचा धोका?
जर कोणी अनोळखी व्यक्ती तुमच्या फोनवरून खालील आकड्यांनी सुरू होणारे कोड डायल करायला सांगत असेल, तर त्वरित सावध व्हा. १, ६१ किंवा ६७ ने सुरू होणारे कोड कॉल फॉरवर्डिंगसाठी वापरले जातात.
फसला असाल तर 'हा' कोड डायल करा!
जर तुम्हाला शंका असेल की तुमची कॉल फॉरवर्डिंग सुरू झाली आहे, तर ती तातडीने बंद करण्यासाठी आपल्या फोनवरून ##002# हा कोड डायल करा. यामुळे सर्व फॉरवर्डिंग सेवा रद्द होतील.
सायबर तज्ज्ञांचा सल्ला:
जर कोणाला खरंच मदत हवी असेल, तर फोन त्यांच्या हातात देण्याऐवजी तुम्ही स्वतः नंबर डायल करा आणि 'स्पीकर'वर बोलण्यास सांगा. सार्वजनिक ठिकाणी अनोळखी व्यक्तीला आपला फोन देणं टाळा. फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या क्रमांकावर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार करा.
