Turkey and Azerbaijan : भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान तुर्कस्तान आणि अझरबैजानचा खरा चेहरा समोर आला होता. या दोन्ही देशांविरोधात भारतीयांनी बहिष्कार घालण्याची माहिम सुरू केली. यानंतर आता पाकिस्तानला पाठिंबा दर्शवणाऱ्या तुर्कस्तान आणि अझरबैजानला भारतीय व्यापाऱ्यांनी देखील मोठा झटका दिला आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापारी संघटनेने शुक्रवारी (१६ मे) दिल्लीत एका राष्ट्रीय व्यापारी परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत देशभरातील १२५ हून अधिक प्रमुख व्यापारी नेत्यांनी एकमताने निर्णय घेतला की देशातील व्यापारी समुदाय तुर्कस्तान आणि अझरबैजानसोबतचे सर्व व्यापार आणि व्यावसायिक संबंध पूर्णपणे तोडेल. यात पर्यटन आणि इतर क्षेत्राचांही समावेश आहे.
..तर चित्रपटांवर बहिष्कार टाकू : सीएआयटी
यासोबतच, व्यापारी समुदायाने भारतीय चित्रपट उद्योगालाही आवाहन केले आहे की त्यांनी तुर्कस्तान किंवा अझरबैजानमध्ये कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण करू नये. जर असे झाले, तर व्यापारी आणि सामान्य जनता अशा चित्रपटांवर बहिष्कार टाकेल, असा इशाराही देण्यात आला आहे. तसेच, कोणत्याही कॉर्पोरेट हाऊसने या देशांमध्ये आपल्या उत्पादनांचे प्रमोशन शूट करू नये, असाही निर्णय परिषदेत घेण्यात आला.
व्यापारी संघटनेचा पीएम मोदींना पाठिंबा
देशातील २४ राज्यांच्या प्रतिनिधींनी या परिषदेत भाग घेतला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शवला. भारताच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या कोणत्याही शक्तीचा ते तीव्र विरोध करतील, असे आश्वासन त्यांनी दिले. तुर्कस्तान आणि अझरबैजानने भारताच्या संवेदनशील आणि गंभीर राष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीत पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिल्याच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आला. व्यापारी समुदाय याला विश्वासघात मानतो, विशेषत: जेव्हा भारताने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही देशांना संकटाच्या वेळी मानवतावादी आणि राजनैतिक मदत पुरवली होती.
वाचा - भारतीय सैन्यांची संवेदनशील माहिती चीनमध्ये जातेय? EaseMyTrip च्या CEO कडून स्क्रिनशॉट शेअर
तुर्कस्तान आणि अझरबैजानचा देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला : प्रवीण खंडेलवाल
परिषदेला संबोधित करताना, सीएआयटीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि भाजप खासदार प्रवीण खंडेलवाल म्हणाले, "हे अत्यंत दुर्दैवी आहे की ज्या तुर्कस्तान आणि अझरबैजानने भारताच्या सद्भावनेचा, मदतीचा आणि धोरणात्मक समर्थनाचा लाभ घेतला, ते आता दहशतवादाला समर्थन देणाऱ्या पाकिस्तानला पाठिंबा देत आहेत. त्यांची भूमिका भारताच्या सार्वभौमत्वावर आणि राष्ट्रीय हितांवर थेट हल्ला आहे, हा १४० कोटी भारतीयांच्या भावनांचा अपमान आहे."