आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या बायजू या एडटेक कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांना अमेरिकेतील दिवाळखोरी कोर्टाने मोठा दंड ठोठावला आहे. कोर्टाच्या आदेशांचे सतत उल्लंघन केल्याबद्दल आणि निधी वळवल्याच्या गंभीर आरोपाखाली रवींद्रन यांना १ अब्ज डॉलरहून (सुमारे ८,३०० कोटी रुपये) अधिक रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत.
हा संपूर्ण प्रकार बायजू अल्फा या उपकंपनीने घेतलेल्या $१.२ अब्ज (१२० कोटी डॉलर) कर्जापैकी $५३.३ कोटी (५३.३ कोटी डॉलर) इतका निधी संशयास्पदरीत्या वळवण्याशी संबंधित आहे. रवींद्रन यांनी $५३.३ कोटींचा निधी चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या ठिकाणी वळवला आहे, तसेच यासंबंधीचे आवश्यक दस्तऐवज कोर्टात सादर केले नाहीत, असा दावा कर्ज देणाऱ्यांनी केला होता.
यावर कोर्टाने रवींद्रन यांना 'डिफॉल्ट' घोषित करत हा निधी वळवल्याबद्दल आणि कोर्टाचे आदेश न पाळल्याबद्दल कठोर दंड ठोठावला. कोर्टाने हे प्रकरण 'असाधारण' असल्याचे मत नोंदवले, ज्यामुळे एवढा मोठा दंड आवश्यक ठरला. या दंडाच्या रकमेत २०१२ मध्ये वळवलेले $५३.३ कोटी आणि हेज फंड कॅमशाफ्टशी संबंधित $५४ कोटी, अशा दोन्ही प्रकरणांतील वसुलीचा समावेश आहे.
यापूर्वी कोर्टाने आवश्यक कागदपत्रे न दिल्याने रवींद्रन यांच्यावर दररोज $१०,००० (सुमारे ८ लाख रुपये) चा दंडही लावला होता, पण त्यांनी ती रक्कम भरली नाही. बायजू कंपनी आधीच अनेक वित्तीय अनियमितता आणि व्यवस्थापनातील प्रश्नांमुळे अडचणीत आहे. या आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या कठोर आदेशामुळे बायजू रवींद्रन यांच्यावरचा कायदेशीर आणि आर्थिक दबाव प्रचंड वाढला आहे.
