BSNL vs Airtel : टेलिकॉम बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. कधीकाळी बंद पडेल की काय अशी अवस्था असलेली सरकारी कंपनीने आता मोठमोठ्या कंपन्यांना मागे टाकायला सुरुवात केली आहे. आपण बोलतोय देशातील सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल विषयी. बीएसएनएलने ऑगस्ट महिन्यात मोठा उलटफेर करत जवळपास एका वर्षानंतर एअरटेलला नवीन मोबाइल ग्राहक जोडण्याच्या बाबतीत मागे टाकले आहे. सोमवार, (७ ऑक्टोबर) रोजी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणने जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
नवीन ग्राहक जोडणीत रिलायन्स जिओ अजूनही अव्वल स्थानी असली तरी, बीएसएनएलने केलेले जबरदस्त पुनरागमन लक्ष वेधून घेणारं आहे.
ग्राहक जोडणीत कुणाची बाजी?
ऑगस्ट महिन्यात, ३५.१९ लाख नवीन मोबाइल ग्राहक टेलिकॉम कंपन्यांना मिळाले. यामध्ये कंपन्यांनी जोडलेले ग्राहक खालीलप्रमाणे आहेत.
- रिलायन्स जिओ: १९ लाखांहून अधिक नवीन ग्राहक.
- बीएसएनएल : १३.८५ लाख नवीन ग्राहक (एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी).
- एअरटेल : ४.९६ लाख नवीन ग्राहक.
या आकडेवारीनुसार, रिलायन्स जिओने नेहमीप्रमाणे आघाडी घेतली असली तरी, बीएसएनएलची वाढ एअरटेलपेक्षा तिप्पट होती.
BSNL च्या पुनरागमनाचे कारण काय?
बीएसएनएलच्या ग्राहक जोडणीतील वाढीचे प्रमुख कारण म्हणजे कंपनीने देशभरात ४जी सेवा सुरू केली आहे. यापूर्वी बीएसएनएल फक्त ३जी सेवा देत असल्याने ग्राहक खासगी कंपन्यांकडे वळत होते. मात्र, आता ४जी सेवेच्या विस्तारामुळे ग्राहक पुन्हा सरकारी कंपनीच्या नेटवर्कशी जोडले जात आहेत.
व्होडाफोन आयडियाला सर्वाधिक फटका
जिओ आणि बीएसएनएल ग्राहक जोडण्यात व्यस्त असताना व्होडाफोन आयडियाला मात्र मोठा फटका बसला आहे. ऑगस्टमध्ये व्होडाफोन आयडियाच्या नेटवर्कवर ३.०८% ची घट नोंदवली गेली, म्हणजेच त्यांचे ग्राहक मोठ्या संख्येने कमी झाले आहेत.
ब्रॉडबँडमध्ये जियो अव्वल
मोबाइल ग्राहक जोडणीत चुरस असली तरी, ब्रॉडबँड सेगमेंटमध्ये रिलायन्स जिओ आपले वर्चस्व कायम ठेवून आहे.
- जिओ: मोबाईल आणि फिक्स्ड लाइन कनेक्शनसह ५० कोटींहून अधिक ब्रॉडबँड ग्राहक.
- एअरटेल : ३०.९ कोटी ब्रॉडबँड कनेक्शनसह दुसऱ्या स्थानी.
- बीएसएनएल : ३.४३ कोटी ब्रॉडबँड ग्राहक.
देशातील एकूण टेलिकॉम ग्राहकांची संख्या जुलैतील १२२ कोटींवरून ऑगस्टच्या अखेरीस १२२.४५ कोटींवर पोहोचली आहे.