Top 100 Most Valuable Brands : भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँडच्या क्रमवारीत या वर्षी मोठा बदल झाला आहे. कँटर ब्रँडझेडच्या २०२५ च्या ताज्या अहवालानुसार, देशातील टॉप आयटी कंपनी टीसीएसला मागे टाकत एचडीएफसी बँक पुन्हा एकदा देशातील सर्वात महागडा ब्रँड ठरला आहे. २०२२ मध्ये टीसीएसने एचडीएफसी बँकेला मागे टाकले होते, पण आता विलीनीकरणानंतर बँकेने पुन्हा एकदा पहिले स्थान पटकावले आहे.
HDFC बँकेची विक्रमी ब्रँड व्हॅल्यू
एचडीएफसी बँकेची सध्याची ब्रँड व्हॅल्यू ४४.९ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे ३७ लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. २०१४ पासून आतापर्यंत या बँकेच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये ३७७% ची जबरदस्त वाढ झाली आहे. विलीनीकरणानंतर बँकेने 'विजिल आंटी' मोहीम, फ्रॉडपासून संरक्षण आणि केवळ ३० मिनिटांत डिजिटल ऑटो लोन यांसारख्या नवीन सेवांवर जोर दिला, ज्यामुळे ग्राहकांशी त्यांचे नाते अधिक मजबूत झाले.
टॉप १०० मध्ये टिकणे झाले कठीण
या वर्षी भारतीय ब्रँड्सच्या वाढीची गती थोडी मंदावली आहे. गेल्या वर्षी ब्रँड व्हॅल्यू १९% वाढली होती, ती यावर्षी फक्त ६% वाढली आहे. कँटरच्या तज्ज्ञांनुसार, ब्रँड्सना आता ग्राहकांच्या खऱ्या गरजा समजून घेऊन त्याप्रमाणे बदल करावे लागतील, अन्यथा टॉप १०० च्या यादीत टिकून राहणे कठीण होईल. सकारात्मक गोष्ट अशी आहे की, भारतातील टॉप १०० ब्रँड्सची एकूण व्हॅल्यू आता ५२३.५ अब्ज डॉलर्स (जीडीपीच्या १३%) इतकी झाली आहे.
अल्ट्राटेक सिमेंटची ऐतिहासिक एंट्री
या वर्षीच्या यादीत १८ नवीन नावांचा समावेश झाला आहे. यामध्ये सर्वात लक्षवेधी प्रवेश सिमेंट क्षेत्रातील अल्ट्राटेक सिमेंटचा आहे. अल्ट्राटेक सिमेंट थेट सातव्या क्रमांकावर आले आहे. याची ब्रँड व्हॅल्यू १४.५ अब्ज डॉलर्स नोंदवली गेली आहे. केवळ मोठ्या प्रकल्पांसाठीच नव्हे, तर सर्वसामान्य घर बांधणाऱ्यांमध्येही अल्ट्राटेक लोकप्रिय झाल्यामुळे ही मोठी झेप दिसली आहे.
झोमॅटोची गती थांबायला तयार नाही
सर्वात वेगवान वाढ झालेल्या ब्रँड्समध्ये सलग दुसऱ्या वर्षी झोमॅटो अव्वल ठरला आहे. झोमॅटोची ब्रँड व्हॅल्यू दुप्पट होऊन ६ अब्ज डॉलर्स झाली आहे. फूड डिलिव्हरीसोबतच ग्रोसर शॉपिंग ॲपमध्ये झोमॅटोचा विस्तार सुरू असल्याने त्याची गती थांबायला तयार नाही.
'एक्सपिरियन्स इकॉनॉमी'ची वाढ
टाटा ग्रुपच्या वेस्टसाइड आणि ज्युडिओ यांसारख्या कंपन्यांनी देखील टॉप १०० मध्ये पहिल्यांदाच प्रवेश केला आहे. याशिवाय, ट्रॅव्हल आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील ब्रँड्सनी मोठी झेप घेतली आहे.
- इंडिगो : ५.१ अब्ज डॉलर्स
- महिंद्रा ॲण्ड महिंद्रा : ५.५ अब्ज डॉलर्स
- ताज हॉटेल्स : २.९ अब्ज डॉलर्स
- मेकमायट्रिप : २.४ अब्ज डॉलर्स
वाचा - आरोग्य विमा होणार स्वस्त? प्रीमियमच्या मनमानी वाढीला लगाम लागणार; सरकार उचलणार 'ही' मोठी पाऊले!
भारतात आता "एक्सपिरियन्स इकॉनॉमी" वेगाने वाढत आहे, म्हणजेच लोक प्रवास करणे, उत्तम ठिकाणी राहणे आणि चांगली ड्रायव्हिंग करणे पसंत करत आहेत. त्यामुळेच हे सर्व ट्रॅव्हल ब्रँड्स दमदार ग्रोथ दाखवत आहेत.
