lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारत जगाचं पोट भरणार! यंदा रेकॉर्ड ब्रेक गहू निर्यात होणार, अनेक देशांशी चर्चा अंतिम टप्प्यात

भारत जगाचं पोट भरणार! यंदा रेकॉर्ड ब्रेक गहू निर्यात होणार, अनेक देशांशी चर्चा अंतिम टप्प्यात

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात गव्हाच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. भारतामध्ये गव्हाचा बफर स्टॉक असल्यामुळे गव्हाच्या किमतींवर अंकुश ठेवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 02:42 PM2022-03-29T14:42:58+5:302022-03-29T14:43:28+5:30

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात गव्हाच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. भारतामध्ये गव्हाचा बफर स्टॉक असल्यामुळे गव्हाच्या किमतींवर अंकुश ठेवला आहे.

booming wheat exports from india to help ease global shortage | भारत जगाचं पोट भरणार! यंदा रेकॉर्ड ब्रेक गहू निर्यात होणार, अनेक देशांशी चर्चा अंतिम टप्प्यात

भारत जगाचं पोट भरणार! यंदा रेकॉर्ड ब्रेक गहू निर्यात होणार, अनेक देशांशी चर्चा अंतिम टप्प्यात

नवी दिल्ली- 

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात गव्हाच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. भारतामध्ये गव्हाचा बफर स्टॉक असल्यामुळे गव्हाच्या किमतींवर अंकुश ठेवला आहे. भारताकडे सध्या १२ दशलक्ष टन निर्यातक्षम गव्हाचा साठा आहे. या वर्षी भारत जगातील त्या देशांना गहू निर्यात करेल, जे पूर्वी रशिया आणि युक्रेनमधून गहू घेत असत. या देशांमध्ये गव्हाचा जगातील सर्वात मोठा आयातदार इजिप्तचाही समावेश यंदा आहे.

रशिया-युक्रेन युद्ध, दुष्काळ आणि जगभरात वाढलेली मागणी यामुळे खाद्यपदार्थांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. शिकागोमधील बेंचमार्क गव्हाच्या किमतीनं गेल्या महिन्यातच 13.635 डॉलर प्रति बुशेल असा आजवरचा उच्चांक गाठला आहे. भारताच्या गव्हाच्या निर्यातीमुळे जागतिक बाजारपेठेत गव्हाचा पुरवठा वाढेल, असं जगभरातील खाद्यपदार्थांवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे. 

भारत इजिप्तला गहू निर्यात करणार 
गव्हाचा सर्वात मोठा आयातदार इजिप्त या देशाशी भारताच्या वाटाघाटी जवळपास पूर्ण झाल्या आहेत. याशिवाय चीन, तुर्की, बोस्निया, सुदान, नायजेरिया आणि इराण हे देशही गहू विकत घेण्यासाठी भारताशी बोलणी करत आहेत. गेल्या दहा महिन्यांत भारताच्या गव्हाच्या निर्यातीत चार पट वाढ झाली आहे. बदललेल्या जागतिक परिस्थितीत, बांगलादेशसारख्या शेजारी देशांव्यतिरिक्त, भारताला आता आफ्रिका आणि मध्य पूर्व प्रदेशातही गहू निर्यात करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

भारत जगाला दिलासा देणार
लाइव्ह मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, सिंगापूरस्थित धान्य आयात-निर्यात फर्म अॅग्रिकूप इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय अय्यंगार यांनी महत्वाचं विधान केलं आहे. भारताच्या गव्हाच्या निर्यातीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गव्हाचा पुरवठा काहीसा रुळावर येईल. सध्या पुरवठा खूपच कमी आहे. अय्यंगार म्हणतात की भारताच्या गव्हाच्या निर्यातीच्या संभाव्यतेनं किमतींवर काही प्रमाणात अंकुश ठेवला आहे. भारतानं गव्हाची निर्यात केली नसती तर गव्हाच्या किमतीनं मोठी झेप घेतली असती. 

अय्यंगार म्हणतात की आता परिस्थिती अशी आहे की प्रत्येक गहू आयात करणारा देश भारताकडून गहू घेण्याचा विचार करत आहे. यावेळी भारतीय गव्हाबाबत जेवढा उत्साह दिसत आहे, तेवढा यापूर्वी कधीही दिसला नव्हता, असेही अय्यंगार म्हणाले. 

चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे. ब्लूमबर्ग सर्वेक्षणानुसार, २०२२-२३ मध्ये भारतातून १२ दशलक्ष टन गहू निर्यात केला जाणार आहे. अमेरिकेच्या कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार, २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताने ८.५ दशलक्ष टन गव्हाची निर्यात केली. पुरवठा घटल्यानं आणि गव्हाच्या किमती वाढल्यानं अनेक देश पहिल्यांदाच भारतातून गहू आयात करतील. भारतात गेल्या पाच हंगामात गव्हाचे विक्रमी उत्पादन होत आहे. यामुळे भारताकडे गव्हाचा पुरेसा अतिरिक्त साठा आहे जो तो निर्यात करू शकतो. यावेळी गहू काढणीचा हंगामही सुरू झाला आहे. यावेळीही विक्रमी उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: booming wheat exports from india to help ease global shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.