Jitendra Property Deal: बॉलीवूड अभिनेते जितेंद्र कपूर आणि त्यांचा मुलगा तुषार कपूर यांच्या कंपन्यांनी मुंबईच्या अंधेरी भागात एक मोठा मालमत्ता व्यवहार केला आहे. त्यांनी एक मोठी व्यावसायिक मालमत्ता ५५९.२५ कोटी रुपयांना 'NTT डेटा'ची उपकंपनी 'NTT ग्लोबल डेटा सेंटर्स अँड क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया'ला विकली आहे. हा व्यवहार ९ जानेवारी रोजी पूर्ण झाला असून, यावर ५.६१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यात आलं आहे. ही मालमत्ता ३२५,०१७ चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेली असून तिचे नाव 'DC-10' बिल्डिंग आहे. ही बिल्डिंग बालाजी आयटी पार्कमध्ये स्थित आहे. गेल्या वर्षी झालेल्या ८५५ कोटी रुपयांच्या व्यवहारानंतर या अभिनेत्यांच्या कंपन्यांनी दुसऱ्यांदा NTT डेटाला मालमत्ता विकली आहे.
भारतातील डेटा सेंटर क्षेत्राची वाढती मागणी
हा व्यवहार भारतातील वेगानं वाढणाऱ्या डेटा सेंटर क्षेत्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतात डिजिटल सेवांचा वापर वाढल्यामुळे, क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा-आधारित तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रवाहामुळे डेटा सेंटरची मागणी वेगाने वाढत आहे. बँकिंग, ई-कॉमर्स, टेलिकॉम आणि सरकारी संस्था यांसारखे उद्योग ही मागणी वाढवत आहेत. मुंबई, चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबाद सारखी शहरं डेटा सेंटरचे मोठे हब बनत आहेत, ज्याचं मुख्य कारण उत्तम डिजिटल कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळाची उपलब्धता हे आहे.
एका शेअरवर ५७ रुपयांचा डिविडंड देणार TATA समूहाची 'ही' कंपनी; रेकॉर्ड डेट जवळ, तुमच्याकडे आहे का?
सरकारची चांगली धोरणं, विजेचा सुधारित पुरवठा आणि विदेशी व देशांतर्गत गुंतवणूकदारांची वाढती रुची यामुळेही या क्षेत्राला चालना मिळत आहे. या सर्व कारणांमुळे भारत जगाच्या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करत आहे.
जपानी कंपनी 'NTT ग्लोबल'ची ओळख
'NTT ग्लोबल डेटा सेंटर्स अँड क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया' ही एक मोठी जपानी कंपनी आहे जी डेटा सेंटर आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित सेवा देते. ही कंपनी पब्लिक आणि प्रायव्हेट क्लाउड, होस्टिंग, डेटा मॅनेजमेंट, ॲप डेव्हलपमेंट, थ्रेट मॉनिटरिंग, कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क आणि टेस्टिंग यांसारख्या सेवा जगभरातील ग्राहकांना प्रदान करते.
जितेंद्र यांनी यापूर्वीही विकली आहे मालमत्ता
या अभिनेत्यांच्या कंपन्यांनी NTT डेटाला मालमत्ता विकण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी मे महिन्यातही त्यांनी मुंबईच्या अंधेरी पश्चिम उपनगरातील २.४ एकर जमीन आणि एक आयटी पार्क ८५५ कोटी रुपयांना NTT डेटाला विकले होते.
या नव्या 'DC-10' बिल्डिंग विक्रीच्या व्यवहाराची नोंदणी ९ जानेवारीला झाली. स्क्वेअर यार्ड्सनं महाराष्ट्र नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक यांच्या कागदपत्रांच्या केलेल्या पुनरावलोकनातून असं समोर आलंय की, या व्यवहारावर ५.६१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आकारलं गेलंय. २०२५ च्या सुरुवातीपर्यंत मुंबई, दिल्ली-एनसीआर, चेन्नई, बंगळुरू आणि कोलकाता सारख्या प्रमुख शहरांमध्ये NTT ची १८ डेटा सेंटर्स कार्यरत होती.
