लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : युद्धामुळे निर्माण झालेला जागतिक तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, रुपयाची ऐतिहासिक घसरण आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय बाजारातून सतत बाहेर पडल्याने भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण झाली. दोन दिवसांच्या तेजीला ब्रेक लागत, सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी २ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली.
सेन्सेक्स १,६९० अंकांनी (२.२५%) घसरून ७३,५८३ वर बंद झाला. निफ्टीही ४८६ अंकांनी (२.०९%) घसरून २२,८१९ वर स्थिरावला. विशेष म्हणजे, या एकाच दिवसाच्या घसरणीने गेल्या दोन दिवसांत मिळवलेली सर्व कमाई पुसून काढली आहे. दिवसभरात बाजारातील एकूणच वातावरण नकारात्मक राहिले. बीएसईमध्ये तब्बल ३,५४४ समभाग घसरले, तर केवळ ८२२ वाढले.
तेल, डॉलर आणि युद्धाचा तिहेरी फटका
अमेरिका-इराण तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा १०० डॉलरच्या वर गेल्या आहेत. ब्रेंट क्रूड ११० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्याने आयात खर्च वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. रुपया ८६ पैशांनी घसरून डॉलरच्या तुलनेत ९४.८२ हा नव्या नीचांकावर आला आहे. परदेशी गुंतवणूकदार सातत्याने विक्री करत असल्याने बाजारावर दबाव वाढला आहे.
एका महिन्यात सेन्सेक्स ११ टक्क्यांनी क्रॅश
इराण-अमेरिका युद्धाला १ महिना झाला असून, या दरम्यान सेन्सेक्स १०.७४ टक्क्यांनी कोसळला आहे. निफ्टीही १०.४८ टक्क्यांनी घसरला आहे. तर बँक निफ्टी (-१४.४०%), निफ्टी मिडकॅप सिलेक्ट (-७.३१%), निफ्टी ऑटो (-१३%), एफएमजीसी (-१२%) हे इंडेक्सही मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बाजार घसरणीची ५ प्रमुख कारणे कोणती?
१. युद्धामुळे जगात भीतीचे वातावरण
२. कच्च्या तेलाचा उडालेला भडका.
३. रुपयाची ऐतिहासिक घसरण.
४. परकीय गुंतवणूकदारांची पाठ
५. जगभरातील बाजारांमधील पडझड.
सर्वच क्षेत्रांत विक्रीचा मारा
पीएसयू बँक -३.८८%
रिअल्टी -३.१०%
ऑटो -२.७९%
बँकिंग -२.७०%
वित्तीय सेवा -२.६९%
मिडकॅप -२.१२%
स्मॉलकॅप -१.७७%
सध्या कच्च्या तेलाचे दर किती?
डब्ल्यूटीआय क्रूड ९६.४९
ब्रेंट क्रूड १११
मर्बन क्रूड ११६
गॅसोलिन ३.१९६
हिटिंग ऑईल ४.३४५
ओपेक बास्केट ११७
इंडियन बास्केट १५७
