Gopichand P Hinduja Death: भारतीय वंशाचे अब्जाधीश आणि जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवणाऱ्या हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद परमानंद हिंदुजा यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले आहे. ब्रिटिश संसदेच्या 'हाऊस ऑफ लॉर्ड्स'चे सदस्य रामी रेंजर यांनी ही माहिती दिली.
जीपी हिंदुजा या नावाने ते जगभर ओळखले जात होते. गोपीचंद हिंदुजा हे सलग सात वर्षे युनायटेड किंगडममधील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले होते. ऑटोमोटिव्ह, ऊर्जा, बँकिंग आणि वित्त, पायाभूत सुविधा आणि मीडिया यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये हिंदुजा ग्रुपचे वर्चस्व आहे. हिंदुजा ग्रुपचा व्यवसाय बँकिंग आणि वित्त (इंडसइंड बँक), ऑटोमोटिव्ह (अशोक लेलँड), ऊर्जा, आरोग्यसेवा आणि रिअल इस्टेट अशा विविध क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे.
प्रदीर्घ आजारानंतर त्यांनी लंडनमधील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. उद्योग जगतातील एका महत्त्वाच्या नेतृत्वाचा अस्त झाल्यामुळे जगभरातील व्यावसायिक आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. गोपीचंद हिंदुजा यांचे निधन केवळ हिंदुजा कुटुंबासाठीच नव्हे, तर जागतिक व्यापार आणि उद्योग जगतासाठी एक मोठी हानी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदुजा समूहाने अनेक आंतरराष्ट्रीय यश संपादन केले.
