Sahara Refund Updates: जर तुम्ही सहारा इंडियामध्ये पैसे गुंतवले असतील आणि क्लेम करूनही तुमच्या खात्यात अद्याप पैसे आले नसतील, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सहारा इंडिया रिफंड पोर्टलवर पुन्हा एकदा 'रिसबमिशन'चा पर्याय उपलब्ध झाला आहे. पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठेवीदारांच्या अर्जांमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत किंवा ज्यांचं पेमेंट झालं नसल्याची सूचना मिळाली आहे, त्यांच्यासाठी ही माहिती महत्त्वाची ठरेल. अशा सर्व ठेवीदारांना अर्जातील त्रुटी दूर करून रिसबमिशन पोर्टलवर दावा पुन्हा सादर करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे.
रिसबमिशन प्रक्रियेतील महत्त्वाच्या बाबी
सध्या १० लाख रुपयांपर्यंतचे दावे पुन्हा सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकदा तुम्ही तुमचा क्लेम योग्य पद्धतीने पुन्हा जमा केला की, पुढील ४५ कामकाजाच्या दिवसांच्या आत त्यावर प्रक्रिया केली जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि पारदर्शक पद्धतीनं राबवली जात आहे. केवळ पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीनं पुन्हा सादर केलेले दावेच ग्राह्य धरले जातील. यासाठी ठेवीदार https://mocresubmit.crcs.gov.in/resubmission/#/home या अधिकृत लिंकचा वापर करू शकतात.
Wife सोबत मिळून पोस्टात उघडा खातं, सरकारच्या गॅरेंटीसह दर महिन्याला होणार ₹९२५० ची बंपर कमाई
आतापर्यंतच्या क्लेम सेटलमेंटची स्थिती
सीआरसीएस-सहारा रिफंड पोर्टलवर (CRCS) आतापर्यंत सादर झालेल्या अर्जांवर प्रक्रिया करण्यात आली असून, ज्या पात्र ठेवीदारांचे दावे पडताळणीत योग्य ठरले आहेत, त्यांना ५०,००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेचं पेमेंट करण्यात आलं आहे. ज्यांच्या अर्जांमध्ये काही त्रुटी आढळल्या आणि ज्यांची पडताळणी होऊ शकली नाही, अशा ठेवीदारांना पोर्टलद्वारे त्यात असलेल्या त्रुटींचे संदेश पाठवण्यात आलेत. हे रिसबमिशन पोर्टल विशेषतः या त्रुटी सुधारण्यासाठीच सुरू करण्यात आलेय. पोर्टलवर येणारा ताण लक्षात घेऊन टप्प्याटप्प्यानं ठेवीदारांसाठी हा पर्याय खुला केला जात आहे.
जर तुम्हाला या प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक मदत किंवा अधिक माहिती हवी असेल, तर तुम्ही पोर्टलच्या हेल्पडेस्क क्रमांक ०११२०९०९०४४ आणि ०११२०९०९०४५ वर संपर्क साधू शकता.
