Crude oil prices: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा आज ३२वा दिवस असून, युद्धस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. या युद्धाचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात दिसून येतोय. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. आज(३१ मार्च) रोजी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल ११६.५० डॉलरच्या पुढे गेली आहे. जून २०२२ नंतरची ही सर्वात मोठी दरवाढ आहे.
ट्रम्प यांच्या धमक्यांचा बाजारावर परिणाम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत इराणबाबत कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी सांगितले की, गरज पडल्यास अमेरिकन सैन्य खार्ग आयलंड ताब्यात घेऊ शकते. येथून इराणची सुमारे ९०% तेल निर्याती होते. जर इराणने करार केला नाही आणि स्ट्रेट ऑफ होर्मुज मार्ग खुला केला नाही, तर आम्ही इराणचे वीज प्रकल्प, तेल विहिरी आणि इतर महत्त्वाची ठिकाणे उद्ध्वस्त करू, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला.
होर्मुज सामुद्रधुनी बंद, जगाच्या तेल पुरवठ्यावर परिणाम
इराणने हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मुज, हा महत्त्वाचा समुद्री मार्ग बंद केला आहे. या मार्गातून जगातील जवळपास २०% कच्च्या तेलाची वाहतूक होते. त्यामुळे जागतिक पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. याशिवाय, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांमुळे जागतिक बाजारात अनिश्चितता वाढली असून, त्याचा थेट परिणाम तेलाच्या किंमतींवर झाला आहे. मार्च महिन्यातच कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये ५० ते ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
तज्ञांचा इशारा, तेल १५० डॉलरपर्यंत जाऊ शकते
बाजार तज्ञांच्या मते, जर युद्ध आणि तणाव अशीच परिस्थिती कायम राहिली, तर कच्च्या तेलाची किंमत १५० डॉलर प्रति बॅरल पर्यंत जाऊ शकते. याचा परिणाम जगभरातील पेट्रोल-डिझेल, महागाई आणि अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे.
भारतावर काय परिणाम होऊ शकतो?
भारत हा मोठ्या प्रमाणावर तेल आयात करणारा देश असल्यामुळे पेट्रोल आणि डिझेल महाग होऊ शकते, महागाई वाढू शकते, विमान प्रवास महाग होऊ शकतो, वाहतूक खर्च वाढू शकतो आणि त्याचा परिणाम शेअर बाजारावर पडू शखतो. एकूणच काय, तर मिडल ईस्टमधील युद्ध केवळ त्या प्रदेशापुरते मर्यादित नसून, त्याचा परिणाम संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे.
