देशातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी ७ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये गेल्या आठवड्यात एकूण ३५,४३९.३६ कोटी रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. दुसरीकडे, उर्वरित ३ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये एकूण २२,११३.४१ रुपयांची वाढ झाली. गेल्या आठवड्यात ख्रिसमसच्या सुट्टीमुळे देशांतर्गत शेअर बाजारात केवळ ४ दिवसच व्यवहार झाले. या काळात बीएसई (BSE) चा बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्समध्ये ११२.०९ अंकांची (०.१३ टक्के) किरकोळ वाढ दिसून आली. गेल्या आठवड्यात भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) मार्केट कॅपमध्ये सर्वात मोठी घसरण झाली, तर एचडीएफसी बँकेच्या मार्केट कॅपमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली गेली.
या कंपन्यांच्या बाजार मूल्यात झाली घट
गेल्या आठवड्यात एसबीआय व्यतिरिक्त रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, लार्सन अँड टुब्रो आणि लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्केट कॅपमध्ये घसरण झाली. याउलट एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि भारती एअरटेल यांच्या मार्केट कॅपमध्ये वाढ पाहायला मिळाली. भारतीय स्टेट बँकेच्या मार्केट कॅपमध्ये सर्वाधिक १२,६९२.१ कोटी रुपयांची घट होऊन ते ८,९२,०४६.८८ कोटी रुपयांवर आले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्यांकन ८२५४.८१ कोटी रुपयांनी घटून २१,०९,७१२.४८ कोटी रुपये झालं, तर बजाज फायनान्सच्या मार्केट कॅपमध्ये ५१०२.४३ कोटी रुपयांचं नुकसान झालं आणि ते ६,२२,१२४.०१ कोटी रुपयांपर्यंत खाली आलं.
इतर कंपन्यांची स्थिती काय?
लार्सन अँड टुब्रोचे मार्केट कॅप ४००२.९४ कोटी रुपयांनी घसरुन ५,५६,४३६.२२ कोटी रुपये झालं. आयसीआयसीआय बँकेचं मार्केट कॅप २५७१.३९ कोटी रुपयांनी कमी होऊन ९,६५,६६९.१५ कोटी रुपयांवर पोहोचलं. एलआयसीचं मार्केट कॅप १८०२.६२ कोटी रुपयांनी कमी ५,३७,४०३.४३ कोटी रुपये आणि टीसीएसचं मूल्यांकन १०१३.०७ कोटी रुपयांनी कमी होऊन ११,८६,६६०.३४ कोटी रुपये झाले.
याउलट, एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप १०,१२६.८१ कोटी रुपयांनी वाढून १५,२६,७६५.४४ कोटी रुपये झालं. इन्फोसिसच्या मार्केट कॅपमध्ये ६६२६.६२ कोटी रुपयांची वाढ होऊन ते ६,८७,८१८.८४ कोटी रुपयांवर पोहोचलं, तर भारती एअरटेलचं मार्केट कॅप ५३५९.९८ कोटी रुपयांनी वाढून १२,००,६९२.३२ कोटी रुपये झालं. जेव्हा एखाद्या कंपनीचं मार्केट कॅप घसरतं तेव्हा तिच्या गुंतवणूकदारांचे नुकसान होतं आणि जेव्हा ते वाढते तेव्हा गुंतवणूकदारांना फायदा होतो.
