अमेरिकन शेअर बाजारात लवकरच एक क्रांतिकारी बदल पाहायला मिळू शकतो. अमेरिकेतील प्रमुख स्टॉक एक्सचेंज 'नॅस्डॅक' (Nasdaq) २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याची योजना आखत आहे. या निर्णयाचा परिणाम भारतासह जगभरातील बाजारपेठांवर होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, यामुळे भारतीय बाजाराची मूळ रचना बदलणार नाही, परंतु जागतिक संकेतांवर भारतीय बाजार ज्या प्रकारे प्रतिक्रिया देतो, त्या पद्धतीत नक्कीच बदल होईल.
रॉयटर्सच्या अहवालानुसार, नॅस्डॅक अमेरिकन बाजार नियामक संस्था 'US SEC' कडे आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकन शेअर्समध्ये २४ तास ट्रेडिंगसाठी परवानगी मिळवणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांकडून अमेरिकन बाजारात कधीही ट्रेड करण्याची मागणी सातत्यानं वाढत असल्यानं नॅस्डॅकनं हे पाऊल उचललंय.
२४ तास ट्रेडिंगकडे नॅस्डॅकची वाटचाल
सध्या नॅस्डॅकमध्ये सुमारे १६ तास ट्रेडिंग होतं. ही वेळ वाढवून ५ दिवस २४ तास (प्रत्यक्षात २३ तास) करण्याची नॅस्डॅकची योजना आहे. सध्या तिथे तीन सत्रात ट्रेडिंग चालते: प्री-मार्केट (सकाळी ४ ते ९:३०), मुख्य मार्केट (सकाळी ९:३० ते सायंकाळी ४) आणि पोस्ट-मार्केट (सायंकाळी ४ ते रात्री ८ - सर्व वेळा अमेरिकन वेळेनुसार).
नवीन व्यवस्था लागू झाल्यानंतर नॅस्डॅक दोन सत्रांत काम करेल. पहिलं 'डे सेशन' (Day Session) सकाळी ४ ते रात्री ८ पर्यंत चालेल. त्यानंतर एक तासाचा ब्रेक असेल, ज्यामध्ये सिस्टमची तपासणी, देखभाल आणि व्यवहारांचे सेटलमेंट केलं जाईल. त्यानंतर 'नाईट सेशन' (Night Session) रात्री ९ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजेपर्यंत चालेल. यामुळे गुंतवणूकदारांना जवळपास पूर्ण दिवस अमेरिकन शेअर्समध्ये व्यवहाराची संधी मिळेल.
जगातील सर्वात मोठी बाजारपेठ
अमेरिकन शेअर बाजार हा जगातील सर्वात मोठा बाजार आहे. जागतिक शेअर बाजाराच्या एकूण मूल्यापैकी सुमारे दोन-तृतीयांश हिस्सा अमेरिकेकडे आहे. तसेच, परदेशी गुंतवणूकदारांनी अमेरिकन शेअर्समध्ये सुमारे १७ ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. नॅस्डॅकच्या या निर्णयामुळे अमेरिकन बाजारातील घडामोडींची माहिती भारतीय गुंतवणूकदारांना अधिक लवकर आणि वेगळ्या वेळी मिळेल, ज्यामुळे त्यांच्या निर्णयावर आणि बाजाराच्या दिशेवर परिणाम होऊ शकतो.
भारतीय गुंतवणूकदारांसाठी काय बदलणार?
व्हीटी मार्केट्सचे ग्लोबल स्ट्रॅटेजी ऑपरेशन्स लीड रॉस मॅक्सवेल यांच्या मते, अमेरिकेत २४ तास बाजार सुरू राहिल्यास भारतीय गुंतवणूकदारांसाठी हा मोठा बदल ठरेल. सध्या रात्री अमेरिकन बाजार बंद झाल्यावर किमती स्थिर असतात, परंतु नवीन व्यवस्थेत रात्रीही किमती बदलत राहतील. सध्या अमेरिकन बाजारातील हालचालींचा परिणाम दुसऱ्या दिवशी भारतीय बाजार उघडल्यावर दिसतो, पण २४ तास ट्रेडिंगमुळे भारतीय गुंतवणूकदार स्थानिक बाजार उघडण्यापूर्वीच अमेरिकन बाजारातील बातम्या आणि चढ-उतारांवर आपली प्रतिक्रिया देऊ शकतील.
याचा परिणाम म्हणून रात्रीच्या वेळी शेअर्समधील चढ-उतार वाढू शकतात. विशेषतः आयटी, फार्मा आणि मेटल्स यांसारख्या जागतिक बाजाराशी थेट जोडलेल्या क्षेत्रांवर याचा जास्त प्रभाव पडू शकतो. मॅक्सवेल यांच्या मते, बाजार उघडताना शेअर्समध्ये मोठी तफावत आणि कमी वेळात तीव्र चढ-उतार अधिक पाहायला मिळतील, कारण जागतिक बातम्या आणि कंपन्यांचे निकाल सातत्यानं किमतींमध्ये प्रतिबिंबित होत राहतील.
याशिवाय, अमेरिकेत लिस्टेड असलेले एडीआर आणि भारतात लिस्ट असलेले त्याच कंपनीचे शेअर्स यांच्यातील किमतीच्या फरकाचा फायदा घेण्याची संधी काही अनुभवी गुंतवणूकदारांना मिळू शकते. मात्र, व्यवहाराचा खर्च आणि नियमांमुळे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी हे फारसे फायदेशीर नसेल.
चलन बाजारावर परिणाम
चलन बाजारावर याचा परिणाम फारसा मोठा नसेल, कारण परकीय चलन बाजार आधीच २४ तास सुरू असतो. त्यामुळे डॉलर-रुपयामध्ये कोणत्याही मोठ्या बदलाची अपेक्षा नाही. मात्र, भारतीय बाजाराच्या वेळेत जर अमेरिकन शेअर्समध्ये मोठी हालचाल झाली, तर रुपयामध्ये दिवसाच्या व्यवहारादरम्यान अधिक चढ-उतार पाहायला मिळू शकतात.
