नवी दिल्ली: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने नोव्हेंबर २०२५ ची आकडेवारी जाहीर केली असून, व्होडाफोन-आयडियासाठी हा महिना अत्यंत कठीण ठरला आहे. या एकाच महिन्यात कंपनीने तब्बल १० लाखांहून अधिक मोबाईल ग्राहक गमावले आहेत. दुसरीकडे, रिलायन्स जिओ, एअरटेल आणि सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल यांनी नवीन ग्राहक जोडण्यात यश मिळवले आहे.
व्होडाफोन-आयडिया गेल्या अनेक महिन्यांपासून आर्थिक समस्या आणि ५जी (5G) रोलआउटमधील विलंबामुळे ग्रासलेली आहे. ग्राहकांचा कल आता हाय-स्पीड डेटा आणि चांगल्या कव्हरेजकडे असल्याने, अनेक युझर्स 'मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी'द्वारे इतर कंपन्यांकडे वळत आहेत.
एअरटेल आणि जिओमध्ये चुरस
नोव्हेंबर महिन्यात रिलायन्स जिओने तब्बल १३.८८ लाख नवीन ग्राहक मिळवत बाजारावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. एअरटेलने देखील १२.१५ लाख नवीन ग्राहक जोडले असून त्यांचा एकूण ग्राहक बेस आता ३९.४८ कोटींवर पोहोचला आहे. जिओकडे आता ४८.६० कोटी ग्राहक झाले आहेत.
Vi साठी धोक्याची घंटा
व्होडाफोन-आयडियासाठी नोव्हेंबर महिना अत्यंत वाईट ठरला. या एकाच महिन्यात १०,११,१३४ ग्राहकांनी कंपनीची साथ सोडली. यामुळे Vi ची एकूण ग्राहक संख्या आता २० कोटींच्या खाली (१९.९७ कोटी) घसरली आहे.
BSNL चा 'कमबॅक'
विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून बीएसएनएलच्या ग्राहक संख्येतही वाढ होताना दिसत आहे. खासगी कंपन्यांनी रिचार्जच्या किमती वाढवल्याचा फायदा सरकारी कंपनीला मिळत असल्याचे चित्र आहे. बीएसएनएलने या महिन्यात ४.२१ लाख नवीन वायरलेस ग्राहक जोडले असून, त्यांचा एकूण आकडा ९.२९ कोटींवर पोहोचला आहे.
