Sanjiv Bajaj Exclusive : कामाचे तास किती असावेत यावरुन देशात गेल्या काही महिन्यांपासून वाकयुद्ध पेटलं आहे. याची सुरुवात इन्फोसिस कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या एका वक्तव्याने झाली होती. यावर आता बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांनी मत मांडले आहे. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२५ पुरस्कार सोहळ्यात लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी संजीव बजाज यांची विशेष मुलाखत घेतली. यामध्ये त्यांनी देशातील संधी, स्टार्टअप उद्योग, कामाचे तास यावर सविस्तर मत मांडले. मुंबईतील राजभवन येथे हा कार्यक्रम पार पडला.
कामाचे तास किती असावेत?
आठवड्यात ७० तास काम करावे असं वाटतं का? असा प्रश्न संजीव बजाज यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, की कोणी किती तास काम करावे, हे आपण नियंत्रित करू शकत नाही. प्रत्येक क्षेत्रात तुमचा रोल काय आहे? यावर तुमचे कामाचे तास ठरू शकतात. आम्ही आमच्या कामगारांचे आउटपुट पाहतो. वेळ नाही, असं स्पष्ट बजाज यांनी मांडले. जर एखादा कंपनी रोज ८ ते १० तास काम करत असेल तर तुम्ही वर्षाच्या शेवटी त्याच्या कामाचे मुल्यमापन कसं करणार? आम्ही आमच्या कंपनीत आठवडा, महिन्याचे टास्क वर काम करतो. चांगलं काम केलं तर तुम्हाला लगेच बोनस मिळेल. यात आम्ही राजकारण दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त वस्तुनिष्ट प्रक्रिया राबवण्यावर आमचा भर असतो. आम्ही कामावर लक्ष्य केंद्रीत करतो, वेळेवर नाही, असं मत बजाज यांनी मांडले.
स्टार्टअप सुरू करताना काय अडचणी आल्या?
नवीन व्यवसाय सुरू करण्याविषयी संजीव बजाज म्हणाले, की कोणताही स्टार्टअप यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नवउद्योजक खूप मेहनत घेतात. यासाठी तो स्वतःच करिअर डावावर लावतो. स्वतःची बचतच नाही तर कुटुंबाची, मित्रांचे पैसे सर्वकाही लावतो. याबाबतीत मी नशीबवान होतो. मला मोठ्या उद्योजक कुटुंबाचा वारसा लाभला आहे. मात्र, स्वतःच्या जीवावर वेगळं काहीतरी उभं करायलाही हिंमत लागते. मी जेव्हा बजाज फिनसर्व्ह स्टार्टअप सुरू केला. त्यावेळी तो छोटा होता. मला कुटुंबातील मोठ्या सदस्यांकडून मार्गदर्शन मिळत होते. सुदैवाने मी यात अपयशी झालो नाही. परंतु, हा सर्व प्रवास रोमांचक होता.
पुढे ते म्हणाले, की माझी आई महाराष्ट्रीयन आहे. माझं स्वतःचं शिक्षण लोकल शाळेत झालं आहे. माझा मुलगाही त्याच शाळेत जातो. कारण, मला वाटतं अशा ठिकाणी मुलांचा योग्य पायाभरणी होते. माझ्या मुलाचे मित्रही स्थानिक आहेत. ते अनेकदा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतात.
स्टार्टअप यशस्वी करण्याचा फॉर्म्युला कोणता?
सर्वप्रथम तुमची आयडिया युनिक असायला हवी. दुसरं म्हणजे तुमच्या व्यवसायाबद्दल तुम्हाला पॅशन हवे. प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येतात. पण, तुम्ही जर पॅशनेट असाल तर व्यवसाय यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे. तिसरं म्हणजे एक चांगली टीम तुम्ही तयार करायला हवी. कुठलाही व्यवसाय उभा करण्यासाठी चांगली टीम खूप महत्त्वाची आहे. चौथे आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला फंडींग करणारा व्यक्ती तुमच्याकडे हवा. ही चतुसुत्री वापरली तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, असं मत संजीव बजाज यांनी मांडले.