TCS Q1 Results No Increment: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे (एप्रिल-जून) निकाल जाहीर केलेत. या तिमाहीत टीसीएसने १२,७६० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे, जो बाजाराच्या अपेक्षेपेक्षा खूपच चांगला आहे. यासोबतच, कंपनीने ६३,४३७ कोटी रुपयांचं उत्पन्न नोंदवलंय. असं असलं तरी टीसीएसच्या कर्मचाऱ्यांसाठी मात्र चांगली बातमी नाही.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) आपल्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आणखी एका तिमाहीसाठी पुढे ढकललीये. कंपनीचे चीफ एचआर ऑफिसर मिलिंद लक्कर यांनी वेतनवाढीच्या चक्राबाबत आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकलो नाही असं म्हटलं. यापूर्वी टीसीएस दरवर्षी १ एप्रिल (आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला) वेतनवाढ लागू करत होती.
चीनला टक्कर देणार! महिंद्रा 'या' कंपनीसोबत हातमिळवणी करणार? कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
कर्मचाऱ्यांची संख्या वाढली
टीसीएसने पहिल्या तिमाहीत (आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत) ५,०९० नवीन कर्मचारी जोडले आहेत. त्यामुळे कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ६ लाख १३ हजारांहून अधिक झालीये. मात्र, भरतीचा संबंध तिमाही वाढीशी जोडता कामा नये, असं लक्कड यांनी स्पष्ट केलं. वर्षभराच्या योजनेअंतर्गत हे काम केलं जातं, असंही ते म्हणाले. फायनान्शिअल एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, मागील तिमाहींमध्ये मोठ्या भरतीनंतर व्यवसायातील आव्हानांमुळे काही 'असमतोल' झाल्याची कबुलीही त्यांनी दिली, ज्याचा वापर पुढील काळात कामामध्ये करण्याचे नियोजन आहे, असंही लक्कड यांनी नमूद केलं.
महसूलात किंचित वाढ
टीसीएसने गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत केवळ १.३ टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली असून महसूल ६३,४३७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील तिमाहीच्या (आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाही) तुलनेत महसुलात १.६ टक्क्यांनी घट झाली.
कंपनीचा नफाही वाढला
मात्र, निव्वळ नफा मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ६ टक्के आणि मागील तिमाहीच्या तुलनेत ४.४ टक्क्यांनी वाढून १२,७६० कोटी रुपये झाला आहे. मोठा प्रकल्प बंद केल्यामुळे झालेली बचत आणि कर सवलतींमुळे ही वाढ शक्य झाली.