Atal Pension Scheme : केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या 'अटल पेन्शन योजने'ची मुदत आता २०३१ पर्यंत वाढवली आहे. आतापर्यंत ८.६६ कोटींहून अधिक लोकांनी या योजनेत नाव नोंदवले आहे. मात्र, मुदतवाढीच्या या निर्णयासोबतच पुन्हा एकदा एक जुना प्रश्न चर्चेत आला आहे - सरकारी किंवा खासगी नोकरी करणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात का? याचे स्पष्ट उत्तर 'नाही' असे आहे.
योजना फक्त 'यांच्यासाठीच'!
अटल पेन्शन योजना ही प्रामुख्याने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. १८ ते ४० वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक ज्याला इतर कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही. गिग इकॉनॉमीमध्ये काम करणारे (उदा. डिलिव्हरी बॉईज), रोजंदारी मजूर, कंत्राटी कामगार आणि छोटे व्यावसायिक.
सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना 'बंदी' का?
केंद्र, राज्य किंवा निमशासकीय कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना या योजनेत सहभागी होता येत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना आधीच जुनी पेन्शन योजना, नवीन पेन्शन योजना किंवा युनिफाइड पेन्शन योजना यांसारख्या पेन्शन योजनांचे कवच उपलब्ध आहे. एकाच वेळी दोन सरकारी पेन्शन योजनांचा लाभ घेता येत नाही.
खासगी कर्मचारी
कॉर्पोरेट किंवा खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी कापला जातो. PFRDA अंतर्गत त्यांना निवृत्तीनंतर पेन्शनची सोय आधीच उपलब्ध असते. त्यामुळे त्यांनाही या योजनेतून वगळण्यात आले आहे.
प्राप्तिकर हा मोठा अडथळा
१ ऑक्टोबर २०२२ पासून सरकारने नियमात मोठा बदल केला आहे. आता जो नागरिक आयकर भरतो, त्याला अटल पेन्शन योजनेचे खाते उघडता येत नाही. बहुतेक सरकारी आणि खासगी नोकरदार टॅक्सच्या कक्षेत येत असल्याने ते या योजनेसाठी अपात्र ठरतात.
वाचा - पॅन कार्ड हवंय? आता घरबसल्या करा अर्ज; ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रक्रियेची 'स्टेप-बाय-स्टेप' माहिती
गुंतवणुकीवर किती मिळते व्याज?
अटल पेन्शन योजनेत व्याजाचा दर निश्चित नसला, तरी 'गॅरंटीड पेन्शन' हे या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. तुमचा पैसा शेअर बाजार, डेट फंड आणि सरकारी रोख्यांमध्ये गुंतवला जातो. सध्या या योजनेवर साधारण ८ टक्के वार्षिक दराने परतावा मिळतो. जर बाजारातील परतावा तुमच्या निवडलेल्या पेन्शन रकमेपेक्षा कमी मिळाला, तर उरलेली रक्कम सरकार स्वतः भरते. जर परतावा जास्त मिळाला, तर तुमची पेन्शन आणि वारसाला मिळणारी रक्कम देखील वाढू शकते.
