भारतातील सर्वात मोठी टूथपेस्ट उत्पादक कंपनी असलेल्या कोलगेट पामोलिव्हची गती सध्या बाजारात बरीच मंदावली आहे. टूथपेस्ट हे सर्वांच्या वापरातील महत्त्वाची वस्तू आहे. मात्र, अलीकडे भारतात टूथपेस्टची विक्री बरीच कमी झाली आहे आणि ती आणखी कमी होताना दिसत आहे.
कंपनीला आता पुढील वर्षापासूनच भारतात विक्रीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, कारण सध्या शहरी भागातील मागणी कमकुवत आहे आणि नुकत्याच झालेल्या जीएसटी दर बदलामुळे पुरवठ्यात (सप्लायमध्ये) अडथळा निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया कोलगेट कंपनीचे अध्यक्ष (चेअरमन) आणि ग्लोबल सीईओ नोएल वॉलेस यांनी दिली.
सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
भारतात कोलगेटच्या विक्रीत घट?
भारतात दिग्गज कोलगेट कंपनीच्या टूथपेस्टच्या विक्रीत बरीच घसरण झाली आहे. कोलगेटचे अध्यक्ष नोएल वॉलेस यांनी सांगितलं की, भारतातील शहरी भागात मागणी थोडी सुस्त आहे, पण ग्रामीण बाजार ठीकठाक कामगिरी करत आहेत. कोलगेट कंपनीच्या भारतीय युनिटनं सलग तीन तिमाहींमध्ये विक्रीत घट नोंदवली आहे.
कोलगेटच्या विक्रीत घट होण्याची कारणं
- कंपनीच्या मते, कोलगेटच्या विक्रीत घट होण्याचे मुख्य कारण जीएसटी कपात आणि इन्व्हेंटरी हे आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात ६.३ टक्क्यांनी घट झाली आहे.
- याशिवाय, भारतातील ₹१६,७०० कोटी रुपयांच्या टूथपेस्ट बाजारात कोलगेटचा वाटा दोन वर्षांपूर्वी ४६.१% होता, जो आता घसरून ४२.६% झाला आहे.
- भारताच्या टूथपेस्ट बाजारात डाबरचा वाटा वाढून १३.९% झाला आहे, तर पतंजलीचा वाटा १०.९% आहे. तसंच, जीएसके कन्झ्युमरचा वाटा ८.८% झाला आहे.
- डाबरनं त्यांच्या ओरल केअर व्यवसायात १४% ची वाढ नोंदवली आहे, तर हिंदुस्तान युनिलिव्हरच्या ओरल केअर विक्रीत किरकोळ घट झाली आहे.
कंपनीची रणनीती
कंपनी बाजारातील आपली स्थिती सुधारण्यासाठी आता प्रीमियम उत्पादनं आणि नवीन इनोव्हेशनवर लक्ष केंद्रित करत आहे. विक्रीत वाढ व्हावी यासाठी कंपनीनं अलीकडेच त्यांचे लोकप्रिय उत्पादन 'कोलगेट स्ट्रॉन्ग टीथ' पुन्हा लॉन्च केलं होतं. "आम्ही आमच्या मुख्य उत्पादनांमध्ये मोठे इनोव्हेशन आणण्यावर आणि प्रीमियम सेगमेंटवर लक्ष केंद्रित करत आहोत, ज्यामुळे मॉडर्न ट्रेड चॅनेलमध्ये आमचा वाटा वाढेल," असं नोएल वॉलेस म्हणाले.
