तुम्ही अजून इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल, तर अजून वेळ न घालवता तो लगेच भरा. रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही 31 जुलैपर्यंत ITR भरला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. मात्र उशिर झाला तरी सर्वच करदात्यांना लेट फाईन भरावा लागणार नाही. कारण ही डेटलाइन फक्त त्या करदात्यांची आहे ज्यांच्या खात्यांचं ऑडिट करण्याची गरज नाही. असं असलं तरी सर्व लोकांनी वेळेवर आयटीआर भरला पाहिजे.
दरम्यान, आपल्या सॅलरीतून टॅक्स पहिलेच कापला गेला आहे, त्यामुळे आपल्याला आयटीआर भरण्याची गरज नाही असं काही कर्मचाऱ्यांना वाटतं. अशा परिस्थितीत ते आयटीआर फाईलही करत नाहीत. चला तर मग आज जाणून घेऊया, कोणत्या प्रकारच्या सॅलराईड कर्मचाऱ्यांना आयटीआर फाईल करणं अतिशय महत्त्वाचं आहे.
कर प्रणालीतील बेसिक सूट मर्यादा सारखीच
काही लोक परमनंट सॅलराईड कर्मचारी असतात. परंतु त्यांचं मूळ उत्पन्न करपात्र श्रेणीत येत नाही. असं असलं तरी अशा लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरला पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर आर्थिक वर्ष 2022-23 (AY 2023-24) साठी, 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीसाठी आयटीआर भरणं अनिवार्य करण्यात आलं आहे. विशेष बाब म्हणजे या व्यक्तींसाठी बेसिक सूटीची मर्यादा जुन्या आणि नवीन दोन्ही कर प्रणालींमध्ये समान आहे.
दुसरीकडे, एखाद्या व्यक्तीचे वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल, तर अशा लोकांसाठी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी दोन्ही प्रकारच्या कर प्रणालींमध्ये मूलभूत सूट मर्यादा स्वतंत्रपणे निश्चित करण्यात आली आहे. जुन्या कर प्रणाली अंतर्गत बेसिक सूट मर्यादा 3 लाख रुपये होती, तर नवीन कर प्रणाली अंतर्गत मूळ सूट मर्यादा 2.5 लाख रुपयांपर्यंत आहे. त्याचप्रमाणे, 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या करदात्यांना, जुन्या कर प्रणाली अंतर्गत मूळ सूट मर्यादा 5 लाख रुपये आणि नवीन कर प्रणाली अंतर्गत 2.5 लाख रुपये आहे.
ठेवींसह सर्व प्रकारच्या उत्पन्नाचा समावेश
विशेष बाब म्हणजे 2023-24 या आर्थिक वर्षापासून नवीन कर प्रणालीमध्ये इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. नवीन कर प्रणाली अंतर्गत, नवीन इन्कम टॅक्स स्लॅब 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 दरम्यान कमावलेल्या उत्पन्नावर लागू होतील. अशा प्रकारे, पुढील वर्षी आयटीआर भरण्यासाठी नवीन इन्कम टॅक्स स्लॅब आवश्यक असतील. एकूण उत्पन्नामध्ये पगार, व्याज, फिक्स डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिटसह सर्व प्रकारच्या उत्पन्नाचा समावेश होतो.
उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या सूट मर्यादेपेक्षा जास्त असेल
सॅलराईड कर्मचार्यांना आयटीआर दाखल करण्याची गरज त्यांचे आर्थिक वर्षात एकूण उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे की नाही यावर अवलंबून असते. यात त्यांचं पगाराशिवाय दुसरं उत्पन्न नाही असं गृहीत धरलं जातं. एचआरए, एलटीए टॅक्स सूट आणि स्टँडर्ड डिडक्शनचा दावा केल्यानंतर सॅलराईड कर्मचाऱ्याचं एकूण उत्पन्न आर्थिक वर्षात 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल, तर आयटीआर भरणे आवश्यक नाही.
60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीने जुन्या कर प्रणालीचा पर्याय निवडल्यास बचत खाते आणि मुदत ठेवींमधून मिळणाऱ्या व्याजावर 'इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न' याखाली कर आकारला जातो. जर एखाद्या व्यक्तीने नवीन कर प्रणालीची निवड केली तर, पगाराचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या सूट मर्यादेपेक्षा जास्त असल्यानं त्याला/तिला आयटीआर भरणं अनिवार्य असेल.