UPI Payment News: युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसवरील (UPI) ऑटोपे सुविधेचा मागोवा घेणं आता पूर्वीपेक्षा सोपं झालं आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (NPCI) सतत आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर लक्ष ठेवण्यासाठी नियम कडक केलेत. बिलिंगच्या अशा पद्धती रोखणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे, ज्या ग्राहकांना स्पष्टपणे समजत नाहीत. यामुळे ग्राहकांना त्यांच्या सबस्क्रिप्शनवर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येईल.
नवीन सेंट्रल पोर्टल आणि पारदर्शकता
NPCI ने 'upihelp.npci.org.in' नावाचं एक नवीन सेंट्रल पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या मदतीने युजर्स त्यांच्या सर्व 'UPI Autopay' सेटिंग्ज एकाच ठिकाणी पाहू आणि व्यवस्थापित करू शकतील. विशेषतः ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या त्या डार्क पॅटर्न रोखण्यासाठी हे पाऊल उचललं गेलं आहे, ज्यामध्ये युजर्सना फसवून अशा ऑटोपेमेंटमध्ये अडकवलं जाते जिथे दरमहा पैसे तर कापले जातात, पण ते बंद करणे किंवा ट्रॅक करणं कठीण असतं. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानंतर NPCI नं देखील पुढाकार घेतलाय. युपीआय नेटवर्कशी संबंधित सर्व कंपन्यांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत हे बदल लागू करावे लागणार आहेत, तोपर्यंत जुने नियम पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
ऑटोपे पोर्टेबिलिटी आणि सुरक्षा
नवीन नियमांनुसार, ग्राहक कोणत्याही युपीआय अॅपच्या 'मॅनेज बँक अकाउंट' किंवा 'ऑटोपे' सेक्शनमध्ये जाऊन त्यांचे सर्व सक्रिय ऑटोपेमेंट पाहू शकतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ऑटोपे पोर्ट करण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे. म्हणजेच, तुम्ही तुमचे ऑटोपे एका युपीआय अॅपवरून दुसऱ्या अॅपवर ट्रान्सफर करू शकता. तसंच, व्यावसायिक देखील त्यांचे पेमेंट प्रदाता बदलू शकतात किंवा त्यांची युपीआय आयडी अपडेट करू शकतात.
या नवीन सुविधेमुळे जुन्या पेमेंट नियमांवर कोणताही परिणाम होणार नाही. सुरक्षा लक्षात घेऊन एनपीसीआयनं स्पष्ट केलंय, ऑटोपे संबंधित कोणताही बदल करण्यासाठी युपीआय पिन (UPI PIN) टाकणं अनिवार्य असेल. ९० दिवसांतून फक्त एकदाच ऑटोपे पोर्ट करता येईल.
तसंच, अॅप्स ग्राहकांना कॅशबॅक किंवा आमिष दाखवून वारंवार अॅप बदलण्यासाठी भाग पाडू शकणार नाहीत. गोपनीयतेची काळजी घेत, ऑटोपे डेटाचा वापर केवळ माहिती दर्शवण्यासाठी केला जाईल, इतर कोणत्याही कारणासाठी नाही. एनपीसीआयने 'UPI Help' नावाचा एक नवीन प्लॅटफॉर्म देखील सुरू केला आहे.
