apple ceo team cook :डोनाल्ड ट्रम्प जेव्हापासून अमेरिकेच्या सत्तेवर आले आहेत, तेव्हापासून अनेक क्षेत्रातील मंडळी धास्तावली आहेत. कारण, ट्रम्प कधी काय निर्णय घेईल याचा भरवसा नाही, असं आतापर्यंतच्या वाटचालीवरुन लक्षात येत आहे. यामध्ये देशातील घुसखोरांना बाहेर काढणे असो की आयात शुल्कात वाढ करणे, अशा अनेक निर्णयांनी जागतिक अर्थव्यवस्थेला हादरे बसले आहेत. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा आता अमेरिकन कंपनींना देखील फटका बसत आहे. आयात शुल्क लादण्याच्या इशाऱ्यानंतर अॅपल कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे टिम कुक यांना अॅपल कंपनीच्या भविष्याची चिंता लागली आहे.
वास्तविक, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून अनेक देशांवर मोठे आयात शुल्क लादत आहेत. त्यांनी आधीच कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर शुल्क वाढवले आहे. भारतावरही शुल्क लादण्याची धमकी व्हाईट हाउसने दिली आहे. यासोबतच इतर देशांवरही अमेरिकन टॅरिफचा धोका आहे. या सगळ्यात अॅपलच्या सीईओची चिंता वाढली आहे. कारण अमेरिका आणि चीन यांच्यात टॅरिफ युद्धाचा भडका उडाला तर त्याचे परिणाम टिम कुक आणि त्यांच्या कंपनीला भोगावे लागतील. इतर टेक दिग्गजांप्रमाणे, टिम कुक देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे, जेणेकरून त्यांना ट्रम्पच्या शुल्काचा फटका बसू नये.
अॅपल कंपनीवर कसा प्रभाव पडेल?
टीम कूक यांच्या ट्रम्प भेटीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. अमेरिकेने चीनमध्ये बनवलेल्या वस्तूंवर १० टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अॅपलच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो. चीनने देखील अॅप डेव्हलपर्सचा शोध सुरू केला आहे. कारण, अद्यापही अॅपलचे उत्पादन केंद्र चीन असून त्यांची सर्वात मोठी बाजारपेठ अमेरिका आहे. चीनमध्ये बनवलेल्या वस्तूंवर टॅरिफ लावल्यास त्याचा थेट परिणाम अॅपलच्या विक्रीवर होईल. दर लागू केल्यास आयफोनच्या किमती वाढतील आणि कंपनीच्या विक्रीत घट होऊ शकते.
अॅपलच्या उत्पादनांना टेरिफ सूट मिळणार?
डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलला चीनवर शुल्क लादण्याबरोबरच कोणतीही अतिरिक्त सूट दिलेली नाही. किंबहुना, गोपनीयता धोरण आणि कायद्याची अंमलबजावणी या मुद्द्यावर अॅपलचे सहकार्य नसल्याबद्दल ट्रम्प यांनी टीका केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आधीच्या कार्यकाळात टीम कुक यांना त्यांच्या ट्रम्प यांच्यासोबतच्या चांगल्या संबंधांचा फायदा झाला होता. अॅपलच्या सिग्नेचर व्हेरिएंटला टॅरिफमधून सूट देण्यात आली होती. पण यावेळी तशी कोणतीच चिन्हे दिसत नाही.