Nirmit Parekh Apna Success Story: मुंबईतील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या निर्माण पारेख यांची कहाणी अतिशय रंजक आहे. वयाच्या ७ व्या वर्षी त्यांनी डिजिटल घड्याळ बनवून लहान वयातच रोबोटिक्सच्या दुनियेत पाऊल ठेवलं. कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी दोन स्टार्टअप सुरू केले. त्यानंतर त्यांनी अॅपलसारख्या कंपनीत उच्च पदावर कामही केलं. पण, स्वत: बिझनेसमन होण्यासाठी त्यानं जास्त पॅकेजसह असलेली आलिशान नोकरी सोडली. जेव्हा त्यानं नोकरी सोडली तेव्हा सगळ्यांना त्यांना वेड्यात काढलं. पण, अवघ्या दोन वर्षांतच त्यांनी सर्वांचे तोंड बंद केलं. आज तयार झालेल्या त्यांच्या 'अपना'चं मूल्यांकन ९१०० कोटी रुपये असून लाखो लोकांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारे व्यासपीठ बनलं आहे.
निर्माण यांना लहानपणापासूनच तंत्रज्ञानाची प्रचंड आवड होती. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी रोबोटिक्स प्रोग्रामिंगचं शिक्षण घेतलं. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी निरमा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून B.Tech केलं. कॉलेजमध्ये असताना त्यांनी इंकॉन टेक्नॉलॉजीज नावाचं स्टार्टअप सुरू केला, जे पूर व्यवस्थापनासाठीच्या उपाययोजनांवर काम करत होतं. B.Tech केल्यानंतर त्यांनी क्रक्सबॉक्स नावाची दुसरी कंपनी सुरू केली.
इंटेलमध्ये मिळालेला जॉब
निर्मित यांचं स्टार्टअप इंटेलनं खरेदी केलं. यासोबतच त्यांनी निर्माण यांना नोकरीही दिली. ते इंटेलमध्ये डेटा अॅनालिटिक्सच्या संचालकपदापर्यंत पोहोचले. नोकरी करत असतानाच त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएही केलं. एमबीएची पदवी घेतल्यानंतर निर्माण इंटेल सोडून अॅपलमध्ये गेले. तिथे त्यांनी आयफोनच्या प्रॉडक्ट अँड स्ट्रॅटेजी टीममध्ये काम केलं.
मोठ्या वेतनाची नोकरी सोडली
नोकरी करत असताना असंघटित ब्लू कॉलर क्षेत्रामध्ये कामगार आणि मालक यांना जोडण्यासाठी कोणतंही व्यासपीठ नाही, हे निर्माण यांच्या लक्षात आलं. यामुळे जिथे लोकांना नोकऱ्या मिळण्यात अडचणी येत आहेत, तिथे कंपन्यांनाही कर्मचारी मिळत नाहीत ही पोकळी त्यांना दिसली. ही पोकळी भरून काढण्यासाठी काहीतरी करायचं असं निर्मित यांनी ठरवलं. त्यांनी अॅपलमधील नोकरी सोडली. त्यांच्या या निर्णयाला अनेकांनी 'मूर्खपणाचे पाऊल' असं म्हटलं.
२०१९ मध्ये सुरू केलं 'अपना'
निर्मित पारेख यांनी २०१९ मध्ये 'अपना'ची सुरुवात केली. २२ महिन्यांमध्ये ही कंपनी युनिकॉर्न बनली. आज अपनाचं मूल्यांकन ९१०० कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. या अॅपवर दीड लाख रुपयांपेक्षा अधिक कंपन्या रजिस्टर्ड आहेत. यामध्ये अनअकॅडमी, बिगबास्केट, व्हाईटहॅट ज्युनिअर, फ्लिपकार्ट, झोमॅटो, डेल्हिवेरीसारख्या मोठ्या ब्रँड्सचा समावेश आहे.