मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मागे ईडीचा ससेमिरा कायम असून, ईडीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी त्यांची आणखी १,१२० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. यामध्ये १८ अचल मालमत्ता, मुदत ठेवी, बँकेतील रक्कम आणि काही समभाग आदींचा समावेश आहे. ईडीने अंबानी यांची आजवर १० हजार ११७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
जप्तीमध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या ७ मालमत्ता, रिलायन्स पॉवरच्या २, रिलायन्स व्हॅल्यू सर्व्हिसच्या ९ मालमत्ता, तसेच रिलायन्स व्हॅल्यू सर्व्हिसच्या नावे असलेल्या मुदत ठेवी आणि पाच कंपन्यांमधील समभाग आदींचा समावेश आहे.
यापूर्वी त्यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स, लि., रिलायन्स कमर्शियल फायनान्स लि. आणि रिलायन्स होम फायन्सची एकूण ८,९९७ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या होत्या. यामध्ये अंबानी यांच्या नवी मुंबईतील धीरूभाई अंबानी नॉलेज सिटी या प्रकल्पाचा देखील समावेश आहे. अशी आतापर्यंत एकूण १० हजार ११७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त झाली. यापूर्वी ईडीने एकदा दिल्लीमध्ये अंबानी यांची चौकशी केली होती. दुसऱ्या चौकशीला ते अनुपस्थित राहिले होते.
काय आहे प्रकरण?
अनिल अंबानी यांच्या उद्योगसमूहाने येस बँकेकडून २०१७ ते २०१९ या कालावधीमध्ये तीन हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, त्यासाठी लाचखोरी झाली, तसेच या कर्जाची रक्कम काही बनावट कंपन्यांच्या माध्यमातून वळवत अफरातफर करण्यात आल्याचा ठपका ईडीच्या ठेवत तपास सुरू केला.
अंबानी यांच्या समूह कंपन्यांनी मनी लॉड्रिंग केल्याची माहिती नॅशनल हाउसिंग बँक, सेबी, नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग ऑथोरिटी, बँक ऑफ बडोदा आणि या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या दोन एफआयआर अशी एकत्रित माहिती ईडीला देण्यात आली. त्या माहितीच्या आधारे ही कारवाई सुरू आहे.
