Anil Ambani News: कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. आणखी एका सरकारी बँकेने त्यांचं लोन अकाऊंट 'फ्रॉड' असल्याचं घोषित केलं. बँक ऑफ बडोदानं रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) आणि अनिल अंबानी यांचं लोन अकाऊंट फ्रॉड असल्याचं घोषित केलं आहे. कंपनीने गुरुवारी एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. जूनच्या सुरुवातीला देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयनंही आरकॉमच्या लोन अकाऊंटला फ्रॉड घोषित केलं होतं. यानंतर, २४ ऑगस्ट रोजी बँक ऑफ इंडियानेही कंपनीच्या लोन अकाऊंटला फ्रॉड घोषित केलं.
आज रिलायन्स कम्युनिकेशन्सचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले. सुरुवातीच्या व्यवहारात, बीएसईवर ते २.८% ने घसरून १.३९ रुपयांवर आले. शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १.३३ रुपये आहे. कंपनीनं सांगितलं की त्यांना २ सप्टेंबर रोजी एक पत्र मिळालं. यामध्ये, बँक ऑफ बडोदानं कंपनी आणि तिचे प्रवर्तक अनिल अंबानी यांचं लोन अकाऊंट 'फ्रॉड' म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात कायदेशीर सल्ला घेतला जाणार असल्याचं कंपनीनं म्हटलं. कंपनीच्या एका माजी संचालकानं सर्व आरोप फेटाळले आहेत. कायदेशीर सल्ला घेऊन आणि पुढील पाऊल उचललं जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं.
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला; निफ्टीही वाढला; 'हे' स्टॉक्स चमकले
कंपनीचा युक्तिवाद
आरकॉम सध्या कॉर्पोरेट दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेतून जात आहे. कर्जदारांच्या समितीनं रिझोल्यूशन प्लॅनला मान्यता दिलीये, परंतु एनसीएलटीची मंजुरी अद्याप प्रलंबित आहे. '१४ बँकांच्या एका कन्सोर्टिअमनं आरकॉमला कर्ज दिलं होते. १० वर्षांहून अधिक काळानंतर, काही बँका आता अनिल अंबानींना लक्ष्य करत आहेत. ते वेगवेगळ्या वेळी कारवाई करत आहेत,' असं अनिल अंबानी यांनी एका निवेदनात म्हटलंय.
बँक ऑफ बडोदाच्या पत्रात नमूद केलेली कर्जे आणि क्रेडिट सुविधा कॉर्पोरेट दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीची आहेत. अनिल अंबानी २००६ मध्ये कंपनीच्या स्थापनेपासून २०१९ मध्ये राजीनामा देईपर्यंत (सुमारे १४ वर्षे) आरकॉमच्या मंडळावर केवळ एक गैर-कार्यकारी संचालक होते. ते कधीही कार्यकारी संचालक नव्हते किंवा कंपनीत कोणतंही महत्त्वाचं पद भूषवलं नव्हतं. कंपनीच्या दैनंदिन कामकाजात किंवा निर्णयांमध्ये त्यांची कोणतीही भूमिका नव्हती, असं कंपनीनं एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटलंय.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)