Anil Ambani News: सिंगापूरस्थित क्यूब हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर III प्रा. लि. (क्यूब हायवेज) अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या पुणे सातारा टोल रोड (PSTR) प्रकल्पातील १००% हिस्सा खरेदी करणार आहे, असं रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरनं शुक्रवारी सांगितले. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, पीएस टोल रोड व्यवहाराचं एंटरप्राइझ मूल्य २००० कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स २८९.५० रुपयांवर बंद झाले, यात बीएसईवर ४% पेक्षा अधिक घसरण झाली.
पीएस टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड, एक स्पेशल पर्पज व्हेइकल (एसपीव्ही) या प्रकल्पाचे संचालन करते. या व्यवहाराचा एक भाग म्हणून, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला ६०० कोटी रुपयांचे इक्विटी उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. हा निधी भविष्यातील प्रमुख व्यवसाय क्षेत्रातील वाढीच्या उपक्रमांसाठी वापरला जाईल. व्हॅल्यू रियलायझेशनशिवाय या व्यवहारामुळे एकत्रित कर्ज १,४०० कोटी रुपयांनी कमी होईल, ज्यामुळे कंपनीची बॅलन्स शीट आणखी मजबूत होईल. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरनं दिलेल्या माहितीनुसार ते स्वतंत्र आधारावर झिरो डेट पोझिशन कायम ठेवतील.
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
महिना अखेरीस व्यवहार पूर्ण होणार
महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा दरम्यानच्या १४० किमी लांबीच्या ६-लेन एक्सप्रेसवेचा विकास, संचालन आणि देखभाल करण्यासाठी पीएस टोल रोड प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करण्यात आली होती. हा प्रकल्प बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर (टोल) मॉडेल अंतर्गत विकसित करण्यात आला आहे. या कॉरिडॉरवर ऑक्टोबर २०१० मध्ये टोल वसूल करण्यास सुरुवात झाली. दरम्यान, आता या महिन्याच्या अखेरीस हा व्यवहार पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. २०२० मध्ये, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरनं त्यांच्या दिल्ली-आग्रा टोल रोड मालमत्तेची विक्री पूर्ण केली. कंपनीनं ती क्यूब हायवेजला एकूण ३६०० कोटी रुपयांना विकली. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर सध्या ७ टोल रोड असेट्सचा डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ ऑपरेट करते.
महिन्याभरात शेअरमध्ये घसरण
गेल्या एका महिन्यात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स २३% पेक्षा जास्त घसरले आहेत. त्याच वेळी, या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ९% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. सहा महिन्यांत कंपनीचे शेअर्स २०% वाढले आहेत. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात कंपनीचे शेअर्स २३% वाढले आहेत. गेल्या पाच वर्षांत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स सुमारे ८४५% नं वाढलेत.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)