Anil Ambani Stocks: अनिल अंबानी समूहातील कंपन्यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स पॉवरचे शेअर्स वाईट स्थितीत आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स पॉवरचे शेअर्स त्यांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून ६०% पेक्षा जास्त घसरले आहेत. शुक्रवारी बीएसईवर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स १६५.३० रुपयांवर घसरले. दरम्यान, रिलायन्स पॉवरचे शेअर्स ४० रुपयांच्या खाली आले. रिलायन्स पॉवरचे शेअर्स बीएसईवर ३९.१४ रुपयांवर घसरलेत.
६० टक्क्यांपेक्षा अधिक घसरण
अनिल अंबानी समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स त्यांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून ६०% पेक्षा जास्त घसरले आहेत. २७ जून २०२५ रोजी ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर ₹४२५ वर पोहोचलेल्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स २१ नोव्हेंबर रोजी बीएसईवर ₹१६५.३० वर घसरलेत. दरम्यान, रिलायन्स पॉवरचे शेअर्स त्यांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून ४५% पेक्षा जास्त घसरले आहेत. रिलायन्स पॉवरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ₹७६.४९ आहे. २१ नोव्हेंबर रोजी अनिल अंबानी समूहाच्या या पॉवर कंपनीचे शेअर्स बीएसईवर ₹३९.१४ वर व्यवहार करत आहेत.
₹१,४५२ कोटींपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या चौकशीचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी १,४५२ कोटींपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त केली. ईडीनं एका निवेदनात ही माहिती दिली. या घटनेला उत्तर देताना, रिलायन्स समूहानं म्हटलं की या मालमत्ता रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या (आरकॉम) आहेत, जी २०१९ पासून या समूहाचा भाग नाही. ईडीच्या निवेदनात म्हटले आहे की एजन्सीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) एक तात्पुरता आदेश जारी केला आहे, ज्यामध्ये मुंबईतील धीरूभाई अंबानी नॉलेज सिटी (डीएकेसी) आणि मिलेनियम बिझनेस पार्क, नवी मुंबई येथील अनेक इमारती तसंच पुणे, चेन्नई आणि भुवनेश्वरमधील भूखंड आणि इमारती जप्त केल्या आहेत. एजन्सीनं म्हटलंय की या मालमत्तांचे मूल्य ₹१,४५२.५१ कोटी आहे आणि ते रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) आणि इतर काही कंपन्यांच्या आहेत. समूहानं एका निवेदनात म्हटलं की आरकॉम गेल्या सहा वर्षांपासून दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. निवेदनात असंही म्हटलं आहे की अनिल अंबानी कोणत्याही प्रकारे रिलायन्स कम्युनिकेशन्सशी संबंधित नाहीत आणि त्यांनी सहा वर्षांपूर्वी २०१९ मध्ये राजीनामा दिला होता.
पाच वर्षात रिलायन्स इन्फ्राच्या शेअर्समध्ये ७००% पेक्षा जास्त वाढ
अनिल अंबानी समूहाची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये गेल्या पाच वर्षात ७००% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. २० नोव्हेंबर २०२० रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स १९.६५ वर होते. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स १६५.३० वर पोहोचले. दरम्यान, गेल्या पाच वर्षात रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये १२००% वाढ झाली आहे. २० नोव्हेंबर २०२० रोजी रिलायन्स पॉवरचे शेअर्स ३ रुपयांवर होते. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स ३९.१४ रुपयांवर व्यवहार करत आहेत.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
