अब्जाधीश अंबानी बंधूंपैकी कर्जाच्या खाईतून हळूहळू वर येत असलेल्या अनिल अंबानी हे एका नव्या महाघोटाळ्याच्या आरोपाने अडचणीत आले आहेत. इन्वेस्टिगेटिव पोर्टल 'कोबरापोस्ट' या संकेतस्थळाने अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स ग्रुपवर तब्बल ४१,९२१ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
पोर्टलच्या दाव्यानुसार, २००६ पासून ग्रुपच्या विविध कंपन्यांमधून निधीची मोठ्या प्रमाणावर अफरातफर करण्यात आली आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्स, रिलायन्स कॅपिटल आणि रिलायन्स होम फायनान्स यांसारख्या सूचीबद्ध कंपन्यांकडून बँक कर्ज, आयपीओ आणि बॉण्ड्सद्वारे उभारलेले सुमारे २८,८७४ कोटी रुपये प्रवर्तकांशी संबंधित कंपन्यांमध्ये वळवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
इतकेच नव्हे तर, सिंगापूर, मॉरिशस आणि युनायटेड किंगडमसह अन्य देशांतील विदेशी कंपन्यांद्वारे अतिरिक्त ₹१३,०४७ कोटी (सुमारे $१.५३५ अब्ज) ची रक्कम 'फसवणुकीने' भारतात आणली गेल्याचा सनसनाटी आरोप 'कोबरापोस्ट'ने केला आहे.
रिलायन्स ग्रुपचे स्पष्टीकरण: 'बदनामीचे षड्यंत्र'
दरम्यान, रिलायन्स ग्रुपने हे सर्व आरोप त्वरित फेटाळून लावले आहेत. ग्रुपने या अहवालाला 'जुनाट, अजेंडा-आधारित कॉर्पोरेट हल्ला' म्हटले आहे. गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्यासाठी आणि शेअर बाजारात घबराट निर्माण करून ग्रुपच्या मालमत्ता कमी भावात खरेदी करण्यासाठी हे 'बदनामीचे षड्यंत्र' रचले जात असल्याचा कंपनीने दावा केला आहे. कोबरापोस्टच्या पत्रकारितेत कोणताही विश्वासार्हता नाही, असेही ग्रुपने त्यांच्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
