Anant Ambani : रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन मंदिरांना १८ कोटी रुपयांची देणगी जाहीर केली आहे. त्यांनी राजराजेश्वरम मंदिर(कन्नूर, तलिपरंबा) आणि गुरुवायूर मंदिरला(त्रिशूर) प्रत्येकी ३ कोटी रुपयांची देणगी दिली. याव्यतिरिक्त, राजराजेश्वरम मंदिराच्या नूतनीकरणासाठी १२ कोटी रुपये देण्याचे वचन दिले. यात मंदिरांच्या विकासासोबतच पशू कल्याणाशी संबंधित उपक्रमांनाही पाठिंबा देण्यात येणार आहे.
राजराजेश्वरम मंदिरासाठी मोठा विकास आराखडा
कन्नूर जिल्ह्यातील तलिपरंबा येथे असलेल्या प्राचीन राजराजेश्वरम मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी अंबानी यांनी विशेष निधी जाहीर केला आहे. या योजनेत ऐतिहासिक ईस्ट गोपुरमचे पुनर्निर्माण, मंदिर परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास आणि भाविकांसाठी सुधारित पार्किंग व्यवस्था केली जाणार आहे. याशिवाय, दीर्घकाळापासून जीर्ण अवस्थेत असलेल्या रचनांचे जतन आणि पुनर्बांधणी करण्यावर भर दिला जाणार आहे.
गुरुवायूर मंदिरात ‘एलिफंट वेलफेअर’ उपक्रमाला पाठिंबा
त्रिशूर जिल्ह्यातील प्रसिद्ध गुरुवायूर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अंबानी यांनी मंदिर ट्रस्टला ₹३ कोटींचे दान दिले. याशिवाय, मंदिराशी संबंधित हत्तींच्या देखभालीसाठी विशेष रुग्णालय, साखळीमुक्त निवास व्यवस्था आणि आधुनिक-वैज्ञानिक पद्धतींच्या देखभाल सुविधा देण्याचे जाहीर केले.
‘वनतारा’ प्रकल्पाशी संबंध
हा उपक्रम वनतारा या वन्यजीव संरक्षण प्रकल्पाशी संबंधित असल्याचे मानले जात आहे. या माध्यमातून प्राण्यांच्या संवर्धनासाठी व्यापक प्रयत्न केले जात आहेत.
