Reliance Industries Limited : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे कनिष्ट चिरंजीव अनंत अंबानी यांच्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी २०२२ मध्येच त्यांच्या तीन मुलांमध्ये कंपनीच्या विविध व्यवसायांची जबाबदारी विभागली होती. मुलगी ईशा अंबानी यांना रिटेलची जबाबदारी देण्यात आली, मोठा मुलगा आकाश अंबानी यांना टेलिकॉमची जबाबदारी देण्यात आली होती. तर धाकटा मुलगा अनंत अंबानी यांना ऊर्जा क्षेत्राची जबाबदारी देण्यात आली. पण, आता मुकेश अंबानी यांनी अनंत यांच्यावर आणखी एक जबाबदारी सोपवली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक मंडळाने अनंत अंबानी यांची कंपनीचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. रिलायन्सने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, मानव संसाधन, नॉमिनेशन आणि पुनर्निर्मिती समितीच्या शिफारशीनुसार, बोर्डाने मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी यांची १ मे २०२५ पासून ५ वर्षांच्या कालावधीसाठी नवीन नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे.
अनंत रिलायन्स ग्रुपच्या अनेक कंपन्यांशी संबंधित आहेत.
अनंत सध्या कंपनीचे गैर-कार्यकारी संचालक आहेत. आता ते रिलायन्सच्या कार्यकारी नेतृत्वाचा भाग होतील. ते रिलायन्स ग्रुपच्या अनेक कंपन्यांच्या बोर्डाशी संबंधित आहेत. यामध्ये मार्च २०२० पासून जिओ प्लॅटफॉर्म्स, मे २०२२ पासून रिलायन्स रिटेल व्हेंचर्स आणि जून २०२१ पासून रिलायन्स न्यू एनर्जी आणि रिलायन्स न्यू सोलर एनर्जी यांचा समावेश आहे. ते सप्टेंबर २०२२ पासून रिलायन्स फाउंडेशनचे बोर्ड सदस्य देखील आहेत.
ईशा आणि आकाश यांनाही जबाबदारी
ऑगस्ट २०२३ मध्ये कंपनीच्या संचालक मंडळाने ईशा आणि आकाश अंबानी यांच्यासह अनंत यांची गैर-कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली होती. ऑक्टोबर २०२३ मध्ये भागधारकांनी त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली होती. आकाश अंबानी २०२२ पासून रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आहेत, तर ईशा अंबानी कार्यकारी संचालक म्हणून रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडचे कामकाज सांभाळत आहेत. आकाश हा त्यांच्या दोन भावंडांपैकी पहिला आहे, ज्याला रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये कार्यकारी संचालकपद मिळाले आहे. अनंतने अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे.
वाचा - TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
प्राणी प्रेमासाठी प्रसिद्ध
अनंत यांचे प्राणीप्रेम जगजाहीर आहे. देशभरातील जखमी वन्यजीवांवर उपचार करण्याच्या कामात ते सहभागी आहेत. ते जगातील सर्वात मोठे प्राणी पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र असलेल्या वनताराचे संस्थापक देखील आहेत. हे गुजरातमधील जामनगर येथे आहे. येथे २००० हून अधिक प्रजातींच्या १.५ लाख पशु-पक्षांना जीवनदान दिलं आहे.