anand mahindra : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या १५ दिवसात भारतीय लष्कराने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे. भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. लष्कर आणि सरकारच्या या कारवाईचे देशभर कौतुक केले जात आहे. आज संपूर्ण देश भारतीय लष्कराच्या सोबत उभा आहे. सेलिब्रेटी आणि उद्योगपतीही यात मागे राहिलेले नाही. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर ऑपरेशन सिंदूरचा फोटो पोस्ट करत महिंद्रा यांनी फक्त दोन ओळी लिहिल्या आहेत. या पोस्टवर युजर्सने कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.
आनंद महिंद्रा यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय?
आनंद महिंद्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, “आमच्या प्रार्थना आमच्या सैन्यासोबत आहेत... एक राष्ट्र म्हणून आम्ही एकत्र उभे आहोत.” आनंद महिंद्रा यांनी एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये “ऑपरेशन सिंदूर” असे लिहिलेले आहे. महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडियावर देशाच्या आणि नागरिकांच्या प्रगतीबद्दल लिहित असतात. आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टवर लाखो वापरकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून भारतीय सैन्याच्या शौर्याचे कौतुक केलं आहे.
Our prayers are with our forces…
— anand mahindra (@anandmahindra) May 6, 2025
One nation…Together we Stand pic.twitter.com/7Ee30rZ8ew
ऑपरेशन सिंदूर कधी आणि कसे सुरू झाले?
भारतीय सैन्याने रात्री उशिरा १.०५ ते १.३० च्या दरम्यान पाकिस्तानमधील ९ वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. भारताच्या या क्षेपणास्त्र हल्ल्यात जैश, लष्कर आणि हिजबुल मुजाहिदीनचे किमान ७० दहशतवादी मारले गेल्याचे सांगण्यात येत आहे. जेव्हा भारताने हल्ला केला तेव्हा त्या ठिकाणी ५०० ते ६०० दहशतवादी उपस्थित होते, असे सांगितले जात आहे.
वाचा - 'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण माहिती सकाळी १० वाजता भारतीय सैन्यातील २ महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिली. भारताच्या या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. या दहशतवादी छावण्यांवर अचूक हल्ल्यांसाठी तिन्ही दलांनी अतिशय शक्तिशाली शस्त्रांचा वापर केल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लष्करी कारवाईत स्कॅल्प क्रूझ क्षेपणास्त्रे, हॅमर प्रिसिजन बॉम्ब आणि लोटेरिंग दारूगोळा यासह लांब पल्ल्याच्या स्ट्राइक शस्त्रांचा वापर करण्यात आला.