नवी दिल्ली : सेबीने अमेरिकन ट्रेडिंग फर्म जेन स्ट्रीट ग्रुप आणि त्याच्याशी संबंधित ३ कंपन्यांवर बंदी घातली आहे. अमेरिकन ट्रेडिंग फर्मवर इंडेक्स एक्सपायरीच्या दिवशी किमतींमध्ये फेरफार करत होती. सेबीने कंपनीची ४,८४३.५७ कोटी रुपयांची बेकायदेशीर कमाई जप्त करण्याचे आदेशही दिले.
कंपनीची रणनीती अतिशय सोपी होती. सकाळी बँक निफ्टी इंडेक्समधील निवडक शेअर्स मोठ्या प्रमाणावर विकत घ्या आणि दुपारी तेवढ्याच आक्रमकतेने विकून टाका. यामुळे शेअरच्या किमतीत तीव्र घसरण होत असे. यामुळे शेअर व्यवहारात नुकसान होत असले तरी इंडेक्स ऑप्शन्समध्ये मोठ्या शॉर्ट पोझिशन्समुळे कंपनीला भरघोस नफा मिळाला. कारण बाजार घसरला की अशा शॉर्ट पोझिशन्सचे मूल्य वाढते.
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
अमेरिकन ट्रेडिंग फर्म जेन स्ट्रीटने डिसेंबर २०२०मध्ये भारतात कामकाज सुरू केले होते. जानेवारी २०२३ ते मार्च २०२५ या कालावधीत कंपनीने तब्बल ३६,६७१ कोटींचा भारतात कथित ‘गैरप्रकारातून मिळवलेला’ नफा कमावला, असा आरोप सेबीने केला आहे.
४,८४३ कोटींचा बेकायदेशीर नफा
सेबीच्या म्हणण्यानुसार, या बनावट पद्धतीमुळे जेन स्ट्रीट ग्रुपने ४,८४३ कोटी रुपयांचा नफा मिळवला. पण, हा नफा नैसर्गिक बाजार चढ-उतारांमुळे नाही, तर खास स्वतःसाठी तयार केलेल्या परिस्थितीमुळे झाला. म्हणून सेबीने आदेश दिला आहे की, ही पूर्ण रक्कम विशेष एस्क्रो खात्यात जमा करावी.
जेन स्ट्रीटने आरोप फेटाळले
जेन स्ट्रीटने सेबीचे आरोप फेटाळून लावले असून, आम्ही सर्व नियमांचे पालन करतो असे म्हटले आहे. कंपनीने सांगितले की, ते सेबीशी बोलून आपली बाजू मांडेल. सेबीने कंपनीला २१ दिवसांचा वेळ दिला आहे.
सेबीला काय सापडले?
एकच डाव, पण तीन वेगवेगळ्या नावांनी जेन स्ट्रीट ग्रुपने भारतात तीन वेगवेगळ्या नावांनी काम केले : १. जेन स्ट्रीट आशिया ट्रेडिंग लिमिटेड, २. जेन स्ट्रीट इंडिया ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, ३. जेन स्ट्रीट आशिया एलएलसी. कागदोपत्री या संस्था वेगवेगळ्या होत्या, पण सेबीच्या तपासानुसार या तिन्ही एकत्रितपणे एकाच नियोजनानुसार काम करत होत्या.
मिरर ट्रेडिंग : सेबीला आढळले की, या संस्थांनी वारंवार एकाच वेळी, एकाच किमतीला एकच करार (उदा. निफ्टी किंवा बँक निफ्टी वायदे व पर्याय) खरेदी आणि विक्री केले. म्हणजेच एक कंपनी खरेदी करत असे, तर दुसरी विक्री करत असे, अगदी काही सेकंदांच्या फरकाने. हे व्यवहार फक्त बाजारातील भाव हलवण्यासाठी किंवा स्थिर ठेवण्यासाठी बनावटपणे केले होते.
एक्सपायरीचा ‘खेळ’ : व्यवहारांचा फोकस महिन्याच्या व आठवड्याच्या शेवटच्या दिवशी (एक्सपायरीच्या दिवशी) होता. जेन स्ट्रीटने शेवटच्या काही मिनिटांत मोठ्या प्रमाणात ऑर्डर लावून निर्देशांकाचा अंतिम दर बदलण्याचा प्रयत्न केला. कारण, निर्देशांक वायदे आणि पर्यायांचे सेटलमेंट अंतिम दरावरच ठरतं, त्यामुळे थोडाही बदल त्यांना मोठा फायदा मिळवून देत होता.
तुमच्या-आमच्यावर काय परिणाम?
जेन स्ट्रीटच्या फेरफार करण्यामुळे इंडेक्सच्या किमती कृत्रिमरीत्या वर-खाली होत गेल्या, ज्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना खोटे संकेत मिळाले.
उदाहरणार्थ, १७ जानेवारी २०२४ रोजी बँक निफ्टी ४८,१२५.१० वरून ४६,५७३.९५ वर घसरला, जो एचडीएफसी बँकेच्या खराब निकालांशी जोडला गेला होता, परंतु जेन स्ट्रीटच्या ट्रेडिंगनेही त्यात भूमिका बजावली होती.
यामुळे गुंतवणूकदारांना चुकीचे ट्रेडिंग निर्णय घ्यावे लागले आणि अनेक वेळा तोटा सहन करावा लागला.