America On Russia: अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम रशियाच्या ऑईल सेक्टरवर दिसू लागला आहे. त्यामुळे भारतातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. बीपीसीएलनं दिलेल्या माहितीनुसार मार्चच्या पुरवठ्यासाठी आवश्यक कार्गो उपलब्ध नाही. १० जानेवारी रोजी अमेरिकेने रशियाच्या ऊर्जा क्षेत्राला लक्ष्य करून अनेक निर्बंध लादले होते. या निर्बंधांमध्ये रशियन तेल कंपन्या, जहाजं, ऑईल व्यापारी आणि विमा कंपन्यांचा समावेश आहे. याचा परिणाम भारतातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर होत आहे.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडनं (BPCL) दिलेल्या माहितीनुसार मार्चमध्ये इंधन पुरवठा करण्यासाठी आवश्यक कार्गो नाही. अमेरिकेने रशियावर लादलेल्या निर्बंधांचा हा थेट परिणाम आहे. अमेरिकेने रशियाच्या ऊर्जा क्षेत्राला लक्ष्य करत अनेक कंपन्या आणि जहाजांवर निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांमुळे रशियाकडून कच्च्या तेलाची निर्यात करणं अवघड झालंय. याचा फटका रशियाकडून कच्च तेल खरेदी करणाऱ्या भारतासारख्या देशांना बसत आहे.
अमेरिकेनं काय केलं?
१० जानेवारी रोजी अमेरिकेनं रशियाच्या ऊर्जा क्षेत्राला लक्ष्य करून मोठ्या प्रमाणावर बंदी घालण्याची घोषणा केली होती. यामध्ये रशियन ऑईल उत्पादक गॅझप्रोम नेफ्ट आणि सुरगुटनेफ्टगासवर निर्बंध, रशियन ऊर्जा निर्यातीत गुंतलेल्या १८३ जहाजांना काळ्या यादीत टाकणं आणि डझनभर ऑईल व्यापारी, तेलक्षेत्रातील सेवा पुरवठादार, टँकर मालक आणि व्यवस्थापक, विमा कंपन्या आणि ऊर्जा अधिकाऱ्यांवर निर्बंध यांचा समावेश आहे. भारताच्या तेल शुद्धीकरण कंपन्यांनी मार्च महिन्यासाठी वाटाघाटी सुरू केल्या असताना निर्बंधांची घोषणा करण्यात आली.
कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात रशियन तेलाचा वाटा ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीतील ३१ टक्क्यांवरून मार्च तिमाहीत २० टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला एप्रिल २०२४ मध्ये बीपीसीएलने प्रक्रिया केलेल्या एकूण कच्च्या तेलात रशियन कच्च्या तेलाचा वाटा ३४ ते ३५ टक्के होता.