Donald Trump Vs Elon Musk: अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान चर्चेत असलेली डोनाल्ड ट्रम्प आणि एलोन मस्क यांची मैत्री आता तुटली आहे. दोघांनीही एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. ट्रम्प यांच्या 'बिग ब्युटीफुल बिल'मुळे संतप्त झालेल्या इलॉन मस्क यांनी आता 'अमेरिका पार्टी' हा नवीन राजकीय पक्ष स्थापन केलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनीही इलॉन मस्कना झटके देण्यास सुरुवात केली आहे. मस्क यांच्या कंपन्यांना अमेरिकन सरकारकडून हजारो कोटींचे कंत्राट मिळाले आहेत आणि ते अमेरिकन हवाई दल आणि नासा यांच्या सहकार्यानं अनेक मोठ्या प्रकल्पांवरही काम करत आहेत. मस्क यांची कंपनी स्पेसएक्सच्या सहकार्यानं अमेरिकन हवाई दल हायपरसोनिक कार्गो डिलिव्हरीची चाचणी घेणार होतं. पण, आता असं होणार नाही. ही चाचणी आता पुढे ढकलण्यात आलीये.
अमेरिकन मिलिट्री पब्लिकेशन स्टार्स अँड स्ट्राइप्समधील एका अहवालात, ही चाचणी सध्यासाठी पुढे ढकलण्यात आल्याचं म्हटलंय. ही चाचणी पॅसिफिक महासागरातील एका लहान बेटावर घेण्यात येणार होती. हा प्रोजेक्ट अशा रॉकेट री-एंट्री वाहनांच्या लँडिंगची चाचणी घेण्यासाठी होता, जे सुमारे ९० मिनिटांत पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यात १०० टनांपर्यंत वस्तू पोहोचवू शकतो. यामुळे मिलिट्री लॉजिस्टिक्समध्ये क्रांतिकारी बदल घडू शकतो, ज्यामुळे दुर्गम भागात जलद पुरवठा पाठवणं सोपं होणार होतं.
... म्हणून चाचणी पुढे ढकलली
जॉन्स्टन अॅटॉलवर राहणाऱ्या समुद्री पक्ष्यांच्या प्रजातींना हा प्रकल्प हानी पोहोचवू शकतो, असा इशारा जीवशास्त्रज्ञ आणि तज्ञांनी दिला होता, त्यानंतर स्पेसएक्सची हायपरसॉनिक रॉकेट कार्गो डिलिव्हरी चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. हवाई दलानं यापूर्वी ते या प्रकल्पाचे पर्यावरणीय मूल्यांकन करणार असल्याचं म्हटलं होतं, परंतु पर्यावरण समूहांच्या विरोधानंतर त्याच्या ड्राफ्टचं प्रकाशन पुढे ढकलण्यात आलं. हवाई दलाच्या प्रवक्त्यानं स्टार्स अँड स्ट्राइप्सशी बोलताना ते यासाठी पर्यायी ठिकाणं शोधत असल्याचं म्हटलं.
स्पेसएक्सच्या सहकार्याने हायपरसॉनिक कार्गो डिलिव्हरी चाचणी पुढे ढकलण्याचं कारण पक्ष्यांवर होणाऱ्या हानिकारक परिणामांचा उल्लेख करत असले तरी, अनेक लोकांचा असा विश्वास आहे की ट्रम्प यांनी आता मस्कना धक्का देण्यासाठी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.