Air India: टाटा समूहाची विमान कंपनी एअर इंडिया सध्या तोट्यात सुरू आहे. एअरलाइन आपले मालक टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्स यांच्याकडून कमीतकमी १.१ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे दहा हजार कोटी रुपयांहून अधिकची मदत मागणार आहे. हा पैसा कंपनीला तिच्या सिस्टम आणि सेवांचा पूर्णपणे ओव्हरहॉल करण्यासाठी आवश्यक आहे, तसंच स्वतःचं इंजिनिअरिंग आणि मेंटेनन्स विभाग तयार करण्यासाठीही ही रक्कम हवी आहे. 'बिझनेस टूडे'नुसार, 'ब्लूमबर्ग'च्या एका रिपोर्टमध्ये हा खुलासा झाला आहे.
सध्या एअर इंडियाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, विशेषतः अहमदाबादमध्ये झालेल्या भयानक विमान अपघातानंतर, ज्यात एका व्यक्तीचा अपवाद वगळता सर्वांना आपले प्राण गमवावे लागले होते. याव्यतिरिक्त, बाजारात स्पर्धाही खूप आहे आणि ऑपरेशन्स चालवताना अडचणी येत आहेत.
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
रिपोर्टमध्ये एअर इंडियाशी संबंधित मोठा खुलासा
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, हे फंडिंग एअर इंडियाला आर्थिक नुकसानीतून सावरण्यास मदत करेल आणि ऑपरेशनल रेझिलिएन्सच्या कमतरता भरून काढण्यासही मदत करेल. टाटा समूहाचा एअर इंडियामध्ये ७४.९ टक्के हिस्सा आहे आणि उर्वरित हिस्सा सिंगापूर एअरलाइन्सकडे आहे. कोणतीही मदत हिस्स्याच्या प्रमाणानुसार असेल आणि पैसा व्याजमुक्त कर्ज म्हणून दिला जाईल की इक्विटी वाढवून दिला जाईल हे अद्याप निश्चित व्हायचे आहे.
नफा कमावण्याच्या प्रयत्नांवर आणखी दबाव वाढला आहे कारण मे महिन्यात पाकिस्तानसोबतच्या सीमा वादांमुळे हवाई क्षेत्रात निर्बंध लागू झाले, ज्यामुळे विमानांना लांबचा पल्ला गाठावा लागत आहे. त्यानंतर १२ जून रोजी अहमदाबादहून टेकऑफ केल्यानंतर लगेचच बोईंग ७८७ ड्रीमलाइनर क्रॅश झालं, ज्यात एका व्यक्तीचा अपवाद वगळता सर्वजणांना प्राण गमवावे लागले.
सुरक्षेच्या चिंतेमुळे, भारताच्या विमान वाहतूक नियामक संस्थेनं संपूर्ण सिस्टीमचे ऑडिट केले आणि जून ते ऑगस्टपर्यंत वाइडबॉडी जेट्सवरील आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या १५ टक्के कमी केली, ज्यामुळे महसुलावर परिणाम झाला.
एअर इंडियाच्या या फंक्शन्सची देखरेख करते सिंगापूर एअरलाइन्स
अहमदाबाद क्रॅशनंतर, सिंगापूर एअरलाइन्स एअर इंडियाच्या अभियांत्रिकी, ऑपरेशन्स आणि विमानतळ सेवा यांसारख्या प्रमुख फंक्शन्समध्ये जवळून सामील झाली आहे. सध्या देखभालीचं काम एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड करत आहे, जी सरकारी आहे आणि पूर्वी एअर इंडियाची उपकंपनी होती.
हे आर्थिक सहाय्य एअर इंडियाला स्वतःची इंजिनिअरिंग आणि मेंटेनन्स कॅपॅबिलीटी वाढविण्यात मदत करेल, जसं की देशाच्या मोठ्या विमानतळांवर हँगर्स बांधणं. एकूणच, ही मदत एअर इंडियाला मजबूत करण्यासाठी आहे जेणेकरून ती पुन्हा चांगल्या प्रकारे उड्डाण करू शकेल. टाटांनी २०२२ मध्ये एअर इंडिया विकत घेतली होती आणि आता या आव्हानाचा सामना त्यांनाही करावा लागत आहे.
रिपोर्टमध्ये म्हटलंय की, एअरलाइन नफ्यात नाही आणि या धक्क्यांशी लढत आहे. सध्या यावर एअरलाइनकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु बातमीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
