Biggest Layoff : २०२५ या वर्षात जागतिक तंत्रज्ञान उद्योगांमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कार्यक्षमतेवर वाढलेल्या फोकसमुळे, जगभरातील मोठ्या टेक कंपन्यांनी एकत्रितपणे १ लाख २० हजारहून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कमी केल्या आहेत. ही कपात केवळ तात्पुरती मंदी नसून, उद्योगातील संरचनात्मक बदलांचे स्पष्ट संकेत देत आहे. चिपमेकर्स, आयटी सर्व्हिसेस, क्लाउड कंपन्या आणि टेलिकॉम कंपन्या अशा प्रत्येक प्रमुख टेक सेक्टरमध्ये मोठी कर्मचारी कपात दिसून आली आहे.
सर्वाधिक कपात करणाऱ्या 'टेक' दिग्गजांची यादी
या वर्षी सर्वाधिक कर्मचारी कपात करून, इंटेल कंपनी आघाडीवर राहिली. सेमीकंडक्टर क्षेत्रातील या कंपनीने वित्तीय स्थिरता आणण्यासाठी आणि फाउंड्री-आधारित बिझनेस मॉडेलकडे वळण्यासाठी सुमारे २४,००० कर्मचाऱ्यांची पदे कमी केली.
त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस होती. टीसीएसमध्ये जवळपास २०,००० कर्मचाऱ्यांची कपात झाली, ज्यामागे कंपनीने 'स्किल मिसमॅच' आणि एआय आधारित डिलिव्हरी मॉडेलचा वेगाने स्वीकार करणे ही कारणे दिली.
- याशिवाय, खर्च कमी करण्यासाठी ऑपरेशन्सची पुनर्रचना करताना, व्हेरायझनने सुमारे १५,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कमी केल्या.
- ॲमेझॉन आणि डेलची कपात : ॲमेझॉनने संघटनात्मक रचना सोपी करण्याच्या उद्देशाने कॉर्पोरेट कार्यबळात घट केली आणि सुमारे १४,००० व्यवस्थापन आणि प्रशासकीय पदे संपुष्टात आणली. तसेच, डेल टेक्नॉलॉजीजने एआय-ऑप्टिमाइझ्ड हार्डवेअरकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि खर्च व्यवस्थापनासाठी सुमारे १२,००० नोकऱ्या कमी केल्या.
- कन्सल्टन्सी क्षेत्रावर परिणाम : ॲक्सेंचर मध्येही क्लायंटची मागणी जनरेटिव्ह एआय प्रोजेक्ट्सकडे वेगाने वळल्यामुळे सुमारे ११,००० कर्मचाऱ्यांची कपात झाली.
- सॉफ्टवेअर आणि क्लाउडमध्ये बदल : एसएपीने क्लाउड कॉम्प्युटिंग आणि बिझनेस एआयसाठी संसाधनांची पुनर्रचना करण्याच्या योजनेअंतर्गत १०,००० पदे कमी करण्याची घोषणा केली. मायक्रोसॉफ्टनेही गेमिंग आणि ॲझ्युर डिव्हिजनसह सुमारे ९,००० नोकऱ्या कमी केल्या; कंपनीचा भर दीर्घकाळ चालणाऱ्या एआय इन्फ्रास्ट्रक्चर गुंतवणुकीवर आहे.
- इतर कंपन्या : तोशिबाने खासगीकरणानंतर पुनर्रचनेसाठी ५,००० पदे आणि सिस्कोने खर्च सायबर सिक्युरिटी आणि एआय डेव्हलपमेंटकडे वळवण्यासाठी ४,२५० कर्मचाऱ्यांची कपात केली.
वाचा - 'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
टेक क्षेत्रातील बदलाचे स्पष्ट संकेत
२०२५ मधील या आकडेवारीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, टेक कंपन्या आता पूर्वीपेक्षा अधिक कार्यक्षम आणि 'एआय सज्ज' होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याचा थेट परिणाम नोकरीच्या बाजारपेठेवर झाला असून, पारंपरिक भूमिकांची जागा आता स्वयंचलित आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कार्यप्रणाली घेत आहेत.
