Stock Market Today: जागतिक संकेत आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर, बुधवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी बीएसई (BSE) सेन्सेक्स १२०.३३ अंकांनी घसरून ७८०८५.६५ च्या पातळीवर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे, एनएसई (NSE) निफ्टीमध्येही ३६.६५ अंकांची घट होऊन तो २४२२४.९५ च्या पातळीवर आला.
सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टीमध्ये टेक महिंद्रा, रिलायंस आणि इंटरग्लोब एव्हिएशन यांसारख्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली, तर कोटक आणि एचडीएफसी बँकेवर दबावाचं वातावरण होतं.
अमेरिकेत रिलायन्सच्या सहकार्याने उभारली जाणार 'ऐतिहासिक' रिफायनरी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा
प्रमुख शेअर्सची स्थिती
बाजार उघडल्यानंतरच्या हालचालींमध्ये टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंटरग्लोब एव्हिएशन, जिओ फायनान्शिअल आणि कोल इंडिया हे निफ्टीमधील प्रमुख वाढणारे शेअर्स ठरले. दुसरीकडे, कोटक महिंद्रा बँक, श्रीराम फायनान्स, एचडीएफसी बँक, अपोलो हॉस्पिटल्स आणि आयसीआयसीआय बँक या शेअर्सना सुरुवातीच्या सत्रात नुकसानीचा सामना करावा लागला.
डॉलरच्या तुलनेत रुपया ४ पैशांनी घसरला
बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ४ पैशांनी कमकुवत होऊन ९१.८९ वर आला. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) पैसे काढून घेणं आणि मध्य-पूर्वेतील तणाव यामुळे रुपयावर दबाव दिसून आला. परकीय चलन व्यापाऱ्यांच्या मते, कमकुवत डॉलर आणि जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या घसरणाऱ्या किमतींमुळे रुपयाची अधिक घसरण थांबली आहे.
इंटरबँक परकीय चलन बाजारात रुपया ९१.९२ वर उघडला आणि व्यवहारादरम्यान तो ९१.८९ पर्यंत घसरला, जो मागील बंद भावापेक्षा ४ पैसे कमी आहे. मंगळवारी रुपया ९२.१९ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर गेला होता, परंतु एसबीआयचे (SBI) बॉण्ड इश्यू आणि आरबीआयच्या (RBI) हस्तक्षेपामुळे रुपया ३६ पैशांनी वधारून ९१.८५ वर बंद झाला होता. विश्लेषकांच्या मते, परदेशी गुंतवणूकदारांच्या हालचाली आणि मध्य-पूर्वेतील अनिश्चितता रुपयाची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
आशियाई आणि जागतिक बाजारपेठांचा कल
भारतीय बाजारात घसरण असली तरी आशियाई बाजारपेठांमध्ये सकारात्मक कल दिसून आला. दक्षिण कोरियाचा 'कोस्पी' ३ टक्क्यांहून अधिक वाढला, तर जपानचा 'निक्केई २२५' २.५ टक्क्यांनी वधारला. शांघाय एसएसई कॉम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँग सेंग हेदेखील ग्रीन झोनमध्ये राहिले. दरम्यान, मंगळवारी अमेरिकन शेअर बाजार स्थिर पातळीवर बंद झाले होते.
