Gautam Adani on Adani Wilmar : गौतम अदानी यांच्या अदानी एंटरप्रायझेसने (AEL) मोठी घोषणा केली आहे. अदानी विल्मर जॉइंट व्हेंचरमधील आपला संपूर्ण हिस्सा विकून कोअर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करणार आहे. ३० डिसेंबर २०२४ रोजी कंपनीनं याबाबत घोषणा केली. अदानी एंटरप्रायझेस अदानी विल्मर या संयुक्त उपक्रमातील आपला संपूर्ण ४४ टक्के हिस्सा विकणार आहे. विल्मर इंटरनॅशनलची उपकंपनी लेन्स अदानी कमोडिटीज एलएलपीकडून (एसीएल) ३१.०६ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे.
किमान पब्लिक शेअरहोल्डिंग निकषांची पूर्तता करण्यासाठी एईएल आपला १३% हिस्सा देखील विकणार आहे. या करारामुळे एईएलला दोन अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक रक्कम मिळेल. ऊर्जा, वाहतूक, लॉजिस्टिक्स आणि इतर महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीसाठी याचा वापर केला जाणार आहे. दरम्यान, शेअरहोल्डर्सनी अदानी विल्मरचं नाव बदलण्यास सहमती दर्शविली आहे.
दोन अब्ज डॉलरची तरतूद
अदानी एंटरप्रायझेसनं (AEL) अदानी विल्मर जॉइंट व्हेंचरमधून आपली संपूर्ण गुंतवणूक काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आपला १३ टक्के हिस्सा विकणार आहे. किमान पब्लिक शेअरहोल्डिंग नियमाचं पालन करण्यासाठी हे केल जाईल. विल्मर इंटरनॅशनलला अतिरिक्त ३१ टक्के हिस्सा विकला जात आहे. ३० डिसेंबर रोजी शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे. या विक्रीतून एईएलला २ अब्ज डॉलरपेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे. हे पैसे 'कोअर इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्म'मध्ये गुंतवले जातील, असं अदानी एन्टरप्राईजेसनं म्हटलंय.
काय आहे अदानींचा प्लॅन?
या विक्रीतून मिळणारी रक्कम ऊर्जा आणि युटिलिटी सर्व्हिसेस, लॉजिस्टिक्स आणि इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी वापरली जाणार आहे. एईएल आणि विल्मर हे अदानी विल्मरचे संस्थापक भागधारक आहेत. दोघांनी मिळून भारतात एफएमसीजी फ्रेन्चायझी तयार केली. अदानी विल्मर ही १००% शहरी कव्हरेज असलेली अग्रगण्य ग्राहक कंपनी आहे. ३०,६०० हून अधिक ग्रामीण भागांमध्येही त्यांचं अस्तित्व आहे. ३० हून अधिक देशांमध्ये त्याची निर्यात केली जाते. जानेवारी २०२२ मध्ये अदानी विल्मरनं आपला आयपीओ लाँच केला होता. जमा झालेल्या निधीचा वापर उत्पादन क्षमता बळकट करण्यासाठी आणि उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करण्यासाठी केला गेला.