Gautam Adani Group : भारतीय आकाशात आपली पकड अधिक घट्ट करण्यासाठी गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने कंबर कसली आहे. केंद्र सरकार खासगीकरणाच्या पुढच्या टप्प्यात जे ११ नवीन विमानतळ भाडेतत्त्वावर देणार आहे, त्या सर्वांसाठी अदानी समूह आक्रमक बोली लावणार आहे. पुढील पाच वर्षांत विमानतळ विस्तारासाठी ११ अब्ज डॉलर्स (सुमारे ९२,००० कोटी रुपये) खर्च करण्याचे उद्दिष्ट समूहाने ठेवले असून, यामुळे नागरी उड्डाण क्षेत्रात अदानी विरुद्ध जीएमआर असा मोठा सामना पाहायला मिळणार आहे.
'अदानी एअरपोर्ट्स'चा विस्तार आणि सरकारचे लक्ष्य
अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्स लिमिटेडचे संचालक जीत अदानी यांनी मुंबईत दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केले की, कंपनी सर्व ११ विमानतळांच्या लिलावात उतरणार आहे. सध्या अदानी समूह देशातील ७ प्रमुख विमानतळांचे संचलन करत असून, या नवीन बोलीमुळे त्यांचे जाळे अधिक विस्तारणार आहे. दुसरीकडे २०४७ पर्यंत देशातील विमानतळांची संख्या सध्याच्या १६३ वरून ३५० ते ४०० पर्यंत नेण्याचे सरकारचे ध्येय आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून अमृतसर, वाराणसीसह ११ विमानतळांचे खासगीकरण केले जाणार आहे.
IPO कधी येणार? जीत अदानी यांनी स्पष्ट केली भूमिका
अदानी एअरपोर्ट्सच्या बहुप्रतीक्षित आयपीओ बाबत बोलताना जीत अदानी यांनी सांगितले की, यासाठी कोणतीही निश्चित तारीख ठरवण्यात आलेली नाही.
- कॅश फ्लोवर लक्ष : कंपनीचा आयपीओ किंवा डीमर्जर तेव्हाच होईल जेव्हा व्यवसाय पूर्णपणे स्वयंपूर्ण होईल आणि ऑपरेशन्स मधून पुरेसा 'कॅश फ्लो' निर्माण होईल.
- सध्याची स्थिती : सध्या कंपनीचा नफा सकारात्मक आहे. परंतु, मोठ्या विस्तार योजनांमुळे सध्या भांडवली खर्चावर जास्त भर दिला जात आहे.
- व्हॅल्यूएशन : कंपनीच्या मूल्यांकनाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून, बाजारातील इतर कंपन्यांच्या तुलनेत ते भविष्यात ठरवले जाईल.
एअरलाइन व्यवसायाला 'नो-एंट्री'
देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या दरवर्षी १० टक्क्यांनी वाढत असून एअरलाईन्सनी १३०० हून अधिक नवीन विमानांच्या ऑर्डर्स दिल्या आहेत. मात्र, तरीही अदानी समूह स्वतःची एअरलाईन सुरू करणार नाही, असे जीत अदानी यांनी स्पष्ट केले. "एअरलाईन व्यवसायातील नफ्याचे प्रमाण खूप कमी असते आणि त्यासाठी वेगळ्या विचारसरणीची गरज असते. आमची ताकद जमिनीवर ठोस मालमत्ता उभी करण्यात आणि दीर्घकालीन प्रकल्प चालवण्यात आहे," असे त्यांनी नमूद केले.
