भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर आता Dream-11 दिसणार नाही. कारण या कंपनीने भारतीय क्रिकेट संघाच्या (BCCI) लीड स्पॉन्सरशिपपासून हटण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या एका निर्णयाने या कंपनीवर मोठे संकट आले आहे. ऑनलाइन गेमिंग विधेयक 2025 ला मंजुरी मिळाल्यानंतर, ड्रीम 11 सारख्या रिअल-मनी गेमिंग प्लॅटफॉर्म्सवर बंदी आली आहे. यामुळे आता ड्रीम-11 वर आपला व्यवसाय गुंडाळण्याची वेळ आली आहे. ड्रीम ११ ने २०२३ मध्ये भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआयसोबत ३५८ कोटी रुपयांत तीन वर्षांचा स्पॉन्सरशिप करार केला होता.
8 अब्ज डॉलर्सची कंपनी -
सरकारच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका हर्ष जैन यांच्या ड्रीम 11 कंपनीला बसला आहे. हर्ष जैन यांनी 2008 मध्ये ड्रीम-11 कंपनी सुरू केली होती. फार कमी काळातच त्यांची कंपनी प्रसिद्ध झाली. या कंपनीला 2019 मध्ये यूनिकॉर्न किताबही मिळाला होता. कंपनीचे बाजार मूल्य 1 अब्ज डॉलरच्याही वर पोहोचले आहे. कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर कोट्यवधी लोक आपली फॅन्टसी टीम बनवून खेळत होते.
कोण आहेत Dream11 चे मालक? -
लोक ड्रीम-११ वर फॅन्टसी टीम तयार करून क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, कबड्डी आणि बास्केटबॉल खेळू शकत होते, परंतु आता सरकारच्या निर्णयामुळे यावर बंदी आली आहे. सरकारच्या या निर्णयाने ८ अब्ज डॉलर्स अर्थात सुमारे ६,९८,४४,७७,८७,२०० रुपये किमतीची ही कंपनी अडचणीत आली आहे. हर्ष जैन, ज्यांचे वडील आनंद जैन हे मुकेश अंबानी यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. त्यांचे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकाशी घनिष्ट संबंध आहेत. हर्ष यांनी नुकतेच मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया जवळ एक बंगलाही विकत घेतला आहे. हर्ष जैन यांचे वडील आनंद जैन आणि अंबानी हे शाळेत असल्यापासूनचे मित्र आहेत.
अंबानी कुटुंबाशी जवळचे संबंध -
रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी आणि आनंद जैन यांचेही चांगले संबंध होते. धीरूभाई अंबानी यांच्या सांगण्यावरून, आनंद जैन १९८१ मध्ये दिल्लीतील त्यांचा व्यवसाय सोडून रिलायन्स समूहात सहभागी झाले. त्यांनी रिलायन्सच्या अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आनंद जैन हे रिलायन्स कॅपिटलचे उपाध्यक्ष आहेत आणि इंडियन पेट्रोकेमिकल्स लिमिटेडच्या बोर्डावरही आहेत. अर्थात हर्ष जैन यांचे अंबानी कुटुंबाशी जवळचे नाते आहेत.