नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या वतीने सोमवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून, या कार्यक्रमात तब्बल ७१ हजार युवकांना नोकरीची नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तरुणांना संबोधितही करणार आहेत, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आली. ऑक्टोबरमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्यात ५१ हजार तरुण-तरुणींना नोकरीची नियुक्तीपत्रे दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. यात पंतप्रधानांनी भाषणात नियुक्तीपत्रे मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या होत्या. सरकारच्या वतीने युवकांना कायमस्वरूपी नोकऱ्या देण्याचा हा उपक्रम सातत्याने सुरू राहील, अशी ग्वाही दिली होती.
देशभरात ४५ ठिकाणी मेळाव्याचे आयोजन
सोमवारी होणारा रोजगार मेळावा देशभरात ४५ ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. केंद्र सरकारची विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये तरुणांना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. यात गृह विभाग, पोस्ट विभाग यासह उच्च शिक्षण, आरोग्य, तसेच कुटुंब कल्याण विभाग आदींचा समावेश आहे.
उपक्रमाची सुरुवात २२ ऑक्टोबर २०२२ पासून
केंद्र सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते की, सरकारने आतापर्यंत लाखो तरुणांना रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीची नियुक्तीपत्रे दिली आहेत. देशभरातील विविध शहरांमध्ये मेळाव्यांचे आयोजन केले आहे. या उपक्रमाची सुरुवात २२ ऑक्टोबर २०२२ मध्ये सरकारच्या वतीने करण्यात आली होती. अनेक तरुणांना चांगल्या संधी मिळाल्या.
रोजगार उपक्रमांना चालना देण्यासाठी, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय आणि सरकारच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या वतीने या मेळाव्यांचे आयोजन केले जात असते. देशभरातील मोठ्या कॉर्पोरेट्सनाही यात सहभागी करून घेतले जाते