Russian Crude Oil Supply: जग सध्या तेल संकटातून सावरू शकलेलं नाही. इराण-अमेरिका/इस्रायल युद्धातील तणाव निवळण्याचे संकेत मिळत असतानाच, आता युक्रेननं रशियावर केलेल्या हल्ल्यांनी चिंता वाढवली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीच्या इराणनं केलेल्या नाकेबंदीनंतर कच्च्या तेलाच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. अशा काळात रशियन तेलानं भारत आणि जगाच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण केल्या, पण आता रशियन तेलावरही संकट आलं आहे.
युक्रेनच्या नव्या हल्ल्यांमुळे रशियाचं मोठं नुकसान झालंय. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांनी रशियाच्या तेल पाइपलाइनचं नुकसान केले असून अनेक टँकर्स जप्त केलेत. यामुळे रशियाच्या तेल निर्यात क्षमतेचा किमान ४० टक्के हिस्सा ठप्प झाला आहे. रॉयटर्सनुसार, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल निर्यातदार असलेल्या रशियासाठी हे गंभीर संकट आहे.
तेलाच्या किमतीत मोठी वाढ
रशियावरील हे संकट अशा वेळी आले आहे जेव्हा इराण युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलर प्रति बॅरलच्या पार गेल्या आहेत. गुरुवारी ब्रेंट ऑईलमध्ये सुमारे २ टक्क्यांची वाढ होऊन ते १०४ डॉलरच्या पुढे गेलं. तसंच अमेरिकन ऑईल देखील २ टक्क्यांच्या वाढीसह ९२ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं आहे. रशियाच्या २.६ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार कच्च्या तेलाचा महसूल आहे.
युक्रेनने तीव्र केले हल्ले
युक्रेननं या महिन्यात रशियाच्या कच्च्या तेलाच्या पायाभूत सुविधांवर ड्रोन हल्ले तीव्र केले आहेत. प्रामुख्याने तीन मोठ्या निर्यात बंदरांना लक्ष्य करण्यात आलं. ब्लॅक सी मधील नोवोरोस्सिएस्क (Novorossiysk) बंदर, बाल्टिक समुद्रातील प्रिमोर्स्क (Primorsk) आणि उस्त-लुगा (Ust-Luga) बंदरांना टार्गेट करण्यात आलं.
रशियाचे नेमकं किती नुकसान?
रशियाची सुमारे २० लाख बॅरल प्रतिदिन निर्यात क्षमता बंद झाली आहे. युक्रेनमधून हंगेरी आणि स्लोव्हाकियाला जाणारी द्रुझबा (Druzhba) पाइपलाइन रशियन हल्ल्यात अंशतः खराब झाल्याचं सांगितलं जात आहे. ड्रोन हल्ल्यानंतर नोवोरोस्सिएस्क टर्मिनल आपल्या ७ लाख बीपीडी क्षमतेपेक्षा खूपच कमी स्तरावर कार्यरत आहे. युरोपमध्ये रशियाशी संबंधित टँकर्स जप्त केल्यामुळे मरमंस्क बंदरातून होणारी ३ लाख बीपीडीची आर्क्टिक तेल निर्यात थांबली आहे.
भारतावर काय परिणाम होणार?
रशियन तेल पुरवठा विस्कळीत झाल्याचा मोठा परिणाम भारतावर होऊ शकतो. अमेरिकन निर्बंधांपूर्वी भारतानं मोठ्या प्रमाणात रशियन तेल खरेदी केलं होतं. अलीकडेच इराण युद्धादरम्यान अमेरिकेने रशियन तेलावरील निर्बंध ३० दिवसांसाठी हटवले होते, ज्याचा फायदा भारताला झाला. भारतानं पुढील महिन्यासाठी ६० दशलक्ष बॅरल रशियन कच्च्या तेलाचे बुकिंग केलंय. जर हा पुरवठा विस्कळीत झाला, तर भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
