Banking Rules Change: ऑगस्ट २०२५ च्या सुरुवातीपासून अनेक महत्त्वाचे आर्थिक नियम बदलणार आहेत. याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर, व्यवहारांवर, प्रवासावर आणि कार्डच्या फायद्यावर होऊ शकतो. ऑगस्ट २०२५ पासून यूपीआय व्यवहार, एसबीआय क्रेडिट कार्डवरील विमा नियम, फास्टॅग आणि इतर गोष्टींशी संबंधित नियमांमध्ये बदल होणारेत. हे बदलणारे नियम तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे.
यूपीआयचे नियम
नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (NPCI) यूपीआय (UPI) प्रणालीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी ऑगस्ट २०२५ पासून अनेक महत्त्वपूर्ण बदल लागू केलेत. एनपीसीआयनं यूपीआय इकोसिस्टमशी संबंधित सदस्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेत. आता तुम्ही मर्यादित वेळाच बॅलन्स चेक करू शकाल, ज्यामुळे सिस्टीमवरील लोड कमी होईल. याशिवाय ऑटोपेसारख्या फंक्शन्ससाठी एपीआय वापराची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आता क्रेडिट कार्डशी संबंधित यूपीआय व्यवहारांचे नियमही अपडेट करण्यात आलेत. ऑटो-पेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. यूपीआय व्यवहार जलद, सुरक्षित आणि प्रभावी करणं हा या बदलांचा उद्देश आहे. यामुळे व्यवहारात येणाऱ्या तांत्रिक अडचणी कमी होतील. जर तुम्ही यूपीआयचा नियमित वापर करत असाल तर तुमच्यासाठी हे नवे नियम समजून घेणं गरजेचं आहे.
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
ट्रेडिंगचे तास वाढणार
एंगेलवननं दिलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२५ पासून मार्केट रेपो आणि ट्राय पार्टी रेपो ऑपरेशन्सच्या ट्रेडिंग तासांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. आता या कामकाजाची वेळ सकाळी ९ ते दुपारी ४ अशी असेल, तर पूर्वी ही वेळ सकाळी ९ ते दुपारी ३ अशी होती. रिझर्व्ह बँकेनं (RBI) जून २०२५ मध्ये जारी केलेल्या परिपत्रकात ही माहिती दिली आहे. या बदलामुळे अल्पमुदतीच्या मनी मार्केटमध्ये लिक्विडिटी आणि लवचिकता वाढण्यास मदत होईल, ज्यामुळे बाजाराची कार्यक्षमता सुधारेल. सरकारी सिक्युरिटीज मार्केट, फॉरेक्स आणि इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्हजचे ट्रेडिंग तास पूर्वीसारखेच राहतील.
रेपो ऑपरेशन हे एक वित्तीय साधन आहे ज्यामध्ये बँक किंवा वित्तीय संस्था दुसऱ्या संस्थेकडून पैसे उधार घेते आणि ठराविक कालावधीनंतर ते पैसे व्याजासह परत खरेदी करण्याचं वचन देते. ट्राय पार्टी रेपो एक विशेष प्रकारचे रेपो ऑपरेशन आहे ज्यामध्ये तीन पक्षांचा समावेश असतो - कर्जदार, उधारी देणारा आणि जो व्यवहाराचा मध्यस्थ आणि व्यवस्थापक आहे तो.
एसबीआय क्रेडिट कार्ड
जर तुम्ही एसबीआयचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. एसबीआय कार्ड ११ ऑगस्ट २०२५ पासून अनेक को-ब्रँडेड क्रेडिट कार्डवरील हवाई अपघात विम्याचे विनामूल्य मिळणारे लाभ बंद करणार आहे. या निर्णयाचा परिणाम एलिट आणि प्राईमसारख्या प्रीमियम व्हेरियंट कार्डवर होणार आहे. काही प्लॅटिनम कार्डच्या निवडक वापरकर्त्यांना याचा फटका बसेल. आता या कार्डवरील एक कोटी आणि ५० लाख रुपयांचे विमान अपघात विमा संरक्षण काढून टाकण्यात आलंय, जे पूर्वी अतिरिक्त लाभ म्हणून मिळत होतं. म्हणजेच प्रवासादरम्यान विमा संरक्षण मिळणार नाही, ज्यामुळे विमानाने वारंवार प्रवास करणाऱ्या आणि या फायद्यांवर अवलंबून असलेल्या ग्राहकांचं नुकसान होऊ शकतं. आपण अन्य विमा पर्यायांचा विचार करू शकता किंवा आपल्या कार्डचे फायदे दुप्पट तपासू शकता.
फास्टॅग वार्षिक पासचा पर्याय
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं खासगी वाहन चालकांसाठी फास्टॅग वार्षिक पास सुरू केला आहे, जो १५ ऑगस्ट २०२५ पासून लागू होईल. पाससाठी तीन हजार रुपये मोजावे लागणार आहेत. यात १ वर्ष किंवा जास्तीत जास्त २०० टोल व्यवहारांचा वैध कालावधी असेल. या पासचा फायदा असा होणार आहे की, या पासमुळे राष्ट्रीय महामार्गावरून वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी टोल भरणं सोपं आणि फायदेशीर होणार आहे. यामुळे टोल भरण्याची प्रक्रिया सोपी होणार असून महामार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांची चांगली सोय होणारे.
पीएनबी ग्राहकांसाठी केवायसी अपडेट
पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) ग्राहकांना ८ ऑगस्ट २०२५ पूर्वी त्यांच्या बँक खात्यांमध्ये केवायसी माहिती अपडेट करावी लागणार आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, तसं न झाल्यास बँक खात्याचं कामकाज बंद होऊ शकतं. बँकेनं दिलेल्या माहितीनुसार, हे निर्देश अशा ग्राहकांसाठी आहेत ज्यांच्या खात्यात ३० जून २०२५ पर्यंत केवायसी अपडेट प्रलंबित होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे अपडेट अनिवार्य करण्यात आलेत. केवायसी अपडेट न केल्यास खात्यातील व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो किंवा खातं तात्पुरतं ब्लॉक होऊ शकतं. बँकिंग सेवा विस्कळीत होऊ नये, यासाठी ग्राहकांनी आपल्या जवळच्या शाखेत वेळेत किंवा अधिकृत चॅनेलद्वारे केवायसी कागदपत्रं सादर करावीत, असं आवाहन बँकेनं केलंय.